संगमनेरात खंडोबा-म्हाळसा यांचा शुभमंगल सोहळा उत्साहात
◻️ खंडोबाचे ‘मामा’ पारख तर, म्हाळसाचे ‘मामा’ होण्याचा बहुमान आमदार खताळांना
◻️ भंडाऱ्याच्या उधळणीने साळीवाडा परिसर पिवळ्या रंगात न्हाऊन निघाला
संगमनेर LIVE | चंपाषष्ठी उत्सवाच्या पवित्र दिनी साळीवाडा येथील मल्हार मार्तड खंडोबा मंदिरात खंडोबा आणि म्हाळसा यांचा शुभमंगल सावधान विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावात, जल्लोषात आणि पारंपरिक उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात खंडोबा देवाचे ‘मामा’ होण्याचा बहुमान खंडोबा भक्त व व्यापारी मदन पारख यांना मिळाला, तर म्हाळसा देवीचे ‘मामा’ म्हणून आमदार अमोल खताळ यांना मान देण्यात आला.
शहरातून पालखीची वाजत-गाजत मिरवणूक..
दरवर्षीप्रमाणे यंदाही चंपाषष्ठी उत्सवाची रंगत द्विगुणित झाली होती. उत्सवाच्या निमित्ताने साळीवाडा येथून खंडोबा देवाच्या पालखीची वाजत-गाजत संपूर्ण शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मंदिरामध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
हजारो भक्तांच्या साक्षीने विवाह सोहळा..
दुपारी ठीक साडेबारा वाजता हजारो खंडोबा भक्तांच्या उपस्थितीत, मंगलमय वातावरणात खंडोबा आणि म्हाळसा यांचा लग्न सोहळा पार पडला. यावेळी आमदार अमोल खताळ, त्यांच्या पत्नी नीलम खताळ, खंडोबा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी तसेच होलमराजा भक्तांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
देवाच्या शुभविवाहानंतर उपस्थित भक्तांनी पारंपरिक तळी भरणे या विधीमध्ये सहभाग घेतला आणि भंडारा व खोबऱ्याची मुक्त उधळण केली. यामुळे संपूर्ण मंदिर परिसर पिवळ्या रंगात न्हाऊन निघाला होता.
पर्यटन विकासासाठी मदतीचे आश्वासन..
यावेळी म्हाळसा देवीचे 'मामा' म्हणून मान मिळालेले आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "मला भाचा - भाची नसल्यामुळे मुला मुलीच्या पाठीमागे उभे राहण्याचे भाग्य लाभले नाही. परंतु खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांमुळे मामा होण्याचे भाग्य मिळाले," असे ते म्हणाले.
खताळ यांनी खंडोबा चरणी सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागे कायम आशीर्वाद राहू द्या, असे साकडे घातले. तसेच, पर्यटन विकासाच्या माध्यमातून महायुती सरकारकडून या खंडोबा मंदिराच्या सुशोभीकरणासाठी निधी दिला असून, यापुढेही शक्य ती सर्व मदत करत राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
महाप्रसादाचा लाभ..
यावेळी आलेल्या हजारो भाविकांसाठी वांगे-भरीत, भाकरी आणि बुंदीचा महाप्रसाद ठेवण्यात आला होता. भाविकांनी भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेऊन हा चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.