निवडणुकीच्या धामधुमीत आमदार अमोल खताळ यांच्या घराची ‘रेकी’
◻️ पोलिसांकडून दोघे ताब्यात; तर्कवितर्काना उधान
संगमनेर LIVE| शहरातील आमदार अमोल खताळ यांच्या निवासस्थानाजवळ मोबाईल कॅमेऱ्याने शुटींग करताना दोन अनोळखी तरुणांना ताब्यात घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आणि यापूर्वी झालेल्या हल्लाप्रकरणी पार्श्वभूमीवर, आमदार खताळ यांच्या निवासस्थानाजवळ ही 'रेकी' नेमकी कशासाठी करण्यात येत होती, याबाबत तर्कवितर्काना उधाण आले आहे. पोलिसांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.
बुधवारी शहरातील मल्हारी मार्तड मंदिरात चंपाषष्ठी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात सर्व उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. ही बैठक आटोपून ते आपल्या निवासस्थानी पोहोचले. याच दरम्यान, त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात दोन अनोळखी तरुण मोबाईलमध्ये त्यांच्या घराचे चित्रीकरण (शूटिंग) करत असल्याचे आमदार खताळ यांच्या मुलाच्या निदर्शनास आले.
या गंभीर बाबीची माहिती तत्काळ सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने या दोन्ही तरुणांना पकडले. त्यांना त्वरित शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या दोन तरुणांपैकी एक जण अहिल्यानगर येथील तर दुसरा युवक संगमनेर तालुक्यातील असल्याचे समजते. दोन्ही तरुणांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी आता त्यांच्या शुटींग करण्यामागील नेमका हेतू काय होता, तसेच त्यांना हे चित्रीकरण करण्याचे आदेश कोणी दिले होते, या दिशेने सखोल तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आमदार खताळ घरी आलेले असतानाच नेमकी शुटींगची वेळ साधण्याचे धाडस का केले गेले?
यापूर्वी गणेश उत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान मालपाणी लॉन्स येथे आमदार खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या जीवघेण्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, आता थेट निवासस्थानाचे शुटींग घेण्याचा प्रयत्न झाल्याने हा केवळ योगायोग आहे की नियोजित घातपाताचा कट, याबद्दल तीव्र संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, तपासातून सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे.