शहरातील ‘त्या’ अवैध धंद्यांना ४० वर्षापासून राजकीय वरदहस्त कुणाचा?
◻️ आमदार अमोल खताळ यांच्याकडून पत्रकार परिषदेत धक्कादायक माहिती समोर
संगमनेर LIVE | संगमनेर शहर आणि परिसरातील तरुणांना व्यसनाधीन करण्याचे खोटे आरोप करून समाजात प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकावर आमदार अमोल खताळ यांनी आज थेट निशाणा साधला. संगमनेरमध्ये चालणाऱ्या अवैध धंद्यांना नेमका राजकीय वरदहस्त कोण देत होते, हे सर्वाना माहीत आहे. एमडी ड्रग्स आणणारे कोण आणि त्यांना कुणाचा आशीर्वाद होता, याचे पुरावे असलेले 'फोटो' त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विधिमंडळात करणार असल्याचे खताळ यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी..
माझ्यावर खोटे आरोप करणारा गट गेल्या अनेक दिवसांपासून ठरवून मोहीम राबवत आहे. या आरोपांना प्रत्युत्तर देताना आमदार खताळ यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. “संगमनेरमध्ये अवैध धंद्यांची पाळेमुळे ४० वर्षांपासून ज्यांच्या संरक्षणात रुजली होती, आज तेच माझ्यावर आरोप करत आहेत, हे जनता ओळखून आहे,” असे ते म्हणाले.
आमदार खताळ यांची आग्रही मागणी..
चार दिवसांपूर्वी झालेल्या कारवाईत एका गाडीवर कारवाई झाली, मात्र दुसरी गाडी पळून गेली. त्या गाडीतील माल कोणाचा होता आणि या धंद्याच्या मागे आर्थिक पाठबळ कुणाचे आहे? माझ्यावर आरोप करणाऱ्या काही राजकीय व्यक्तींचे मोबाईल सीडीआर (CDR), त्यांचे व्यवहार आणि त्यांचे संपर्क यांची सखोल तपासणी व्हावी. कारण कारवाईपूर्वी काही गावांमध्ये 'अशी कारवाई होणार' अशी माहिती फोडली गेली होती.
या सर्व प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची विनंती करणार असल्याचे खताळ म्हणाले.
घराची रेकी, जीवाला धोका होण्याची भीती..
या पत्रकार परिषदेत आमदार खताळ यांनी आपल्या वैयक्तिक सुरक्षेबद्दल अत्यंत गंभीर आणि धक्कादायक माहिती दिली. संगमनेर शहरातील घुलेवाडी रस्त्यावर असणाऱ्या त्यांच्या घराची दोन अनोळखी व्यक्ती रेकी करताना बॉडीगार्डने पकडल्या. त्यांच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यात खताळ यांच्या घराची आणि गाडीची शूटिंग आढळली.
या घटनेवर चिंता व्यक्त करताना खताळ म्हणाले, “कोणत्या हेतूसाठी हे फोटो काढले जात आहेत? उद्या माझ्या ऑफिसमध्ये किंवा घरात कुणी वेगवेगळ्या माध्यमातून काही ठेवून मला फसवण्याचा प्रयत्न केला तर? हे प्रकार अत्यंत धोकादायक आहेत.”
महिला-तरुण मुलींना चुकीच्या मार्गावर नेणाऱ्या जाळ्याचा तपास व्हावा..
ड्रग्स आणि अवैध धंद्यांच्या विषयाबरोबरच त्यांनी एक सामाजिक धोकाही समोर आणला. “संगमनेरमधील काही महिला आणि तरुण मुलींना चुकीच्या मार्गावर नेण्यासाठी काही लोकांचे जाळे काम करत असल्याची माहिती माझ्याकडे आहे. त्यामागे कोण आहे, याचाही तपास झाला पाहिजे.”
शेवटी, आमदार खताळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मी कोणतेही व्यसन करत नाही आणि मी स्वतः तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. संगमनेरला व्यसनमुक्त करणे, अवैध धंदे संपवणे आणि शहराचा विकास हीच माझी प्राथमिकता आहे.” असे सांगितले.