शहराचा वारसा जपण्यासाठी सेवा समितीला साथ द्या - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
शहराचा वारसा जपण्यासाठी सेवा समितीला साथ द्या - बाळासाहेब थोरात

◻️ ​विकासाच्या तीस वर्षाचे वैभव जपण्याचे केले मतदारांना आवाहन 


​संगमनेर LIVE | संगमनेर शहराला १९९१ पूर्वी असलेल्या गोंधळातून बाहेर काढत, आदर्श शिस्त लावली आणि सततच्या विकास कामातून हे शहर उभे केले. शुद्ध पाणी, सुसंस्कृत आणि शांततेचे वातावरण तसेच वैभवशाली इमारती आणि रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात आले. मात्र, मागील एका वर्षात काही अपप्रवृत्ती शहराचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. संगमनेर शहराची वैभवशाली परंपरा जपण्यासाठी सर्वांनी संगमनेर सेवा समितीच्या पाठीशी उभे राहावे, असे भावनिक आणि महत्त्वपूर्ण आवाहन महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

​गणेश नगर व जयहिंद सर्कल येथे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सत्यजीत तांबे आणि उमेदवार दिलीपराव पुंड, सौ. सीमा खटाटे, भारत बोराडे, सौ. अर्चना दिघे, पांडुरंग घुले, श्याम शेठ पारख, अजित काकडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

​१९९१ पासून ३० वर्षात एकही वाद नाही..

​बाळासाहेब थोरात यांनी यावेळी संगमनेरच्या विकासाचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले की, १९९१ पासून संगमनेर शहराला आदर्श शिस्त लागली. तीस वर्षांच्या कार्यकाळात विकासाचे सर्व ठराव एकमताने पास झाले, एकदाही वाद झाला नाही. आम्ही सातत्याने निधी आणून मोठमोठी विकास कामे मार्गी लावली. यामध्ये हायटेक बस स्थानक, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती यांसह इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानकापर्यंतचा आदर्श रस्ता, तसेच ३५ हून अधिक गार्डन्सचा समावेश आहे.

​स्वच्छ पाणी योजना आणि निळवंडे धरण..

​शहराला पाणीटंचाईतून मुक्त करण्यासाठी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. शहरासाठी ३८ किलोमीटरची स्वतंत्र पाईपलाईन टाकून पाणी आणले आणि पूर्ण शहरात नवीन पाईपलाईनचे जाळे तयार केले. नवीन पाण्याच्या टाक्याही उभारल्या, ज्यामुळे आज सर्वाना स्वच्छ पाणी मिळत आहे. “हे आपोआप होत नाही, यामागे कोणाचे तरी कष्ट आहेत. यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो,” असे ते म्हणाले.

​अमली पदार्थाची तस्करी, गुंडागर्दी; थोरात यांची चिंता..

​शांतता आणि सर्व धर्म समभावाचे शहर म्हणून संगमनेरने आपली ओळख जपली आहे. मात्र, मागील एका वर्षात शहरात बिघडलेल्या वातावरणाबद्दल थोरात यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “मागील एक वर्षात शहरांमध्ये अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. गुंडागर्दी वाढली असून पोलीस स्टेशनमध्ये मारामाऱ्या होत आहेत. ड्रग्स रॅकेट चालवणारा व्यक्ती बस स्थानकासमोर झालेल्या मोर्चाच्या स्टेजवर बसतो आहे. यांना कोण परवानगी देतो, हे तपासले पाहिजे. आपल्याला हे बिघडलेले वातावरण दुरुस्त करायचे आहे.” त्यांनी संगमनेर सेवा समितीच्या कार्यक्षम उमेदवारांना साथ देण्याचे आवाहन केले.

​‘संगमनेर २.०' चा संकल्प, महिला सुरक्षेला प्राधान्य - सत्यजीत तांबे

​आमदार सत्यजीत तांबे यांनी 'संगमनेर २.०' या नव्या विकासाच्या टप्प्याचा संकल्प जाहीर केला. ते म्हणाले की, संगमनेरकरांनी संगमनेरकरांसाठी तयार केलेले व्यासपीठ म्हणजे सेवा समिती आहे. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात शांतता आणि सुसंस्कृतपणा टिकवून ठेवला आहे.

​या नव्या टप्प्यात गरिबांसाठी पक्की घरे देण्याचा मानस असून, निधीची कमतरता पडू देणार नाही. मागील वर्षातील गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या वाढीवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “नेतृत्व करणाऱ्याकडे लोक येतात, फोटो काढतात, त्यामध्ये नेत्याचा दोष नसतो. आम्ही कधीही गुन्हेगारांना पाठीशी घातलेले नाही.” भविष्यात महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन महिलांचे गस्त पथक नियुक्त केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

​डॉ. मैथिलीताई तांबे उच्चशिक्षित आणि कार्यक्षम नेतृत्व..

​नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. मैथिलीताई तांबे यांचे थोरात यांनी विशेष कौतुक केले. त्या स्वतः दंतवैद्य (डेंटिस्ट) आहेत. तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड अशा विविध भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. “अत्यंत धाडसी गृहिणी असलेल्या, हाताला चव असणाऱ्या डॉ. मैथिलीताई तांबे शहराच्या विकासासाठी चांगले योगदान देतील,” असे थोरात म्हणाले. त्यांच्या मार्गदर्शनासाठी ज्येष्ठ कार्यकर्त्यांची फळी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान ​यावेळी दिलीपराव पुंड आणि अजित काकडे यांचीही भाषणे झाली. सभेला संगमनेर शहरातील नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !