विकसित भारतासाठी विद्यार्थ्यामध्ये संशोधन वृत्ती महत्त्वाची - पर्यवेक्षक चव्हाण
◻️ अश्वी इंग्लिश स्कूलच्या विज्ञान-गणित प्रदर्शनातून ६० नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या अश्वी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नुकताच शालेय विज्ञान व गणित प्रदर्शन कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. 'विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी' या मुख्य विषयावर आधारित ६० हून अधिक विद्यार्थ्यानी शाश्वत शेती, हरित ऊर्जा, कचरा व्यवस्थापन आणि उद्योनमुख तंत्रज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण मॉडेल्स आणि प्रयोगांचे यशस्वी सादरीकरण केले.
संशोधन वृत्ती वाढवण्यासाठी उपक्रम महत्त्वाचे - पर्यवेक्षक चव्हाण
प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन विद्यालयाचे पर्यवेक्षक दीपक चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना संशोधनाच्या वृत्तीवर भर दिला.
पर्यवेक्षक दीपक चव्हाण म्हणाले, “विज्ञान-गणित प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यामध्ये संशोधन वृत्ती वाढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचा प्रत्यक्ष फायदा त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक आणि करिअरच्या वाटचालीत होतो. प्रदर्शनांमध्ये विद्यार्थी स्वतःच्या कल्पना मांडतात, प्रयोग करतात व समस्यांचे निराकरण शोधतात, ज्यामुळे त्यांच्यात तर्कशक्ती, विश्लेषणात्मक विचार आणि सर्जनशीलता विकसित होते.”
चव्हाण यांनी पुढे सांगितले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकातील ज्ञान अपुरे आहे. प्रयोगशीलता आणि नवकल्पना स्वीकारणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यानी प्रयोगशीलतेला आणि नवोन्मेषी विचारांना चालना दिली, तर विकसित व आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत त्यांचा मोठा वाटा असेल.”
नाविन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष..
या प्रदर्शनात शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन व प्लास्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, उद्योनमुख तंत्रज्ञान, गणितीय मॉडेलिंग, आरोग्य-स्वच्छता, जलसंवर्धन व व्यवस्थापन या क्षेत्रांवर आधारित ६० विद्यार्थ्यानी अतिशय कल्पक मॉडेल्स आणि उपकरणांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यानी दाखवलेली विज्ञानावरील आस्था, कल्पकता आणि प्रात्यक्षिक कौशल्याचे ग्रामस्थ, पालक आणि उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
प्रदर्शनाचे उद्घाटन पर्यवेक्षक दीपक चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक रमेश थेटे, बी. एम. सहाणे यांच्या हस्ते संपन्न झाले. स्पर्धेचे परीक्षण बी. एम. सहाणे, प्रशांत वाळुंज, महारुद्र तांबे, सुवर्णा वाकचौरे व भरती बागुल यांनी केले.
पाठ्यपुस्तकापलीकडील अनुभव - परीक्षक
परीक्षणानंतर बोलताना परीक्षक सुवर्णा वाकचौरे यांनी उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. “शाळा-महाविद्यालयांमध्ये आयोजित होणाऱ्या विज्ञान-गणित प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती विकसित होण्यास मोठी मदत होते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्याना पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रयोगशीलता, विचारमंथन आणि नवकल्पनांचा अनुभव मिळतो,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विद्यालयाचे प्राचार्य डी. के. वडितके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडले.
तालुकास्तरीय प्रदर्शनासाठी निवड
या प्रदर्शनातील यशस्वी विद्यार्थ्याची निवड आगामी ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन तळेगाव येथील शिक्षण महर्षी गुलाबराव जोंधळे माध्यमिक विद्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती (बातमी) पत्रकार वैभव ताजणे यांनी कळवली आहे.