विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - आमदार सत्यजीत तांबे

संगमनेर Live
0
विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - आमदार सत्यजीत तांबे

◻️ गरीबाना ५०० स्क्वेअर फूटची पक्की घरे देणार!

​संगमनेर LIVE | लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर शहराच्या विकासाची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत, शहरात वाढलेल्या अवैध धंद्यांवर तीव्र चिंता व्यक्त केली. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन करत, विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास आमदार सत्यजीत तांबे यांनी शहरवासीयांना दिला.

​मालदाड रोड, अलकानगर, गणेश नगर, मोमीनपुरा येथे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभांमध्ये ते बोलत होते. यावेळी माजीमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह सेवा समितीचे सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​थोरात साहेबांचा आदर, विकासाची परंपरा कायम..

​यावेळी बोलताना आमदार सत्यजीत तांबे यांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्याचा गौरव केला. “लोकनेते बाळासाहेब थोरात हे राज्याचे नेते आहेत. त्यांचे सर्व पक्षात अत्यंत चांगले संबंध आहेत. मंत्रालयात कोणत्याही मंत्र्याकडे काम घेऊन गेलो, तर पहिले थोरात साहेबांचे विचारतात. त्यांचा सर्वजण आदर करतात. त्यांनी कायम संगमनेर शहर घडवले आणि नावारूपाला आणले,” असे ते म्हणाले.

​ते पुढे म्हणाले, हीच विकासाची परंपरा आपण कायम ठेवणार असून, शहराच्या विकास कामांकरता कोणताही निधी कमी पडू देणार नाही. गरीब लोकांना ५०० स्क्वेअर फूटची पक्की घरे देण्याचा मानस असून, त्यासाठी निधी आणण्यासाठी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा आवश्यक असतो, तसेच चांगले संबंधही ठेवावे लागतात.

​ट्रक टर्मिनल लवकरच, पण अवैध धंद्यांवर चिंता..

​संगमनेर सेवा समिती राजकारण विरहित असून २० नवीन व ११ जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचे तांबे यांनी सांगितले. शहरातील ट्रॅफिकची समस्या कमी करण्यासाठी पंचायत समितीजवळ साडेसात कोटी रुपयांमधून ट्रक टर्मिनल उभारण्यात आले असून, आगामी काळात सर्व ट्रक पार्किंग त्या ठिकाणी करण्यात येईल.

​शहराच्या समस्यांवर बोट ठेवत ते म्हणाले, “माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे पाईपलाईनद्वारे शहरवासीयांना स्वच्छ व मुबलक पाणी दिले. शिक्षणाच्या निमित्ताने राज्यभरातून हजारो विद्यार्थी येथे येत आहेत, पालक मोठ्या विश्वासाने मुलांना पाठवत आहेत. मात्र, मागील एक वर्षापासून संगमनेरची परिस्थिती बदलली असून, अवैध धंदे वाढले आहेत, अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे, गुंडागर्दी वाढली आहे. मागील आठवड्यात एका मुलाचा हात तोडला जातो, पोलीस स्टेशनमध्ये मारामाऱ्या होतात. हे सर्व काय सुरू आहे?” यामुळे संगमनेरची प्रतिमा खराब होत असून, हे सर्व थांबवण्याची जबाबदारी यापुढे सर्वाची आहे, असे आवाहन त्यांनी केले.

​राजकीय मतभेद विसरून शांतता राखा..

​माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही शहराच्या सद्यःस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. “संगमनेर शहराची अत्यंत चांगली वाटचाल राहिली आहे. बंधू भावाचे वातावरण राहिले आहे. विकासासाठी सातत्याने योजना राबवल्या, कधीही भेदभाव केला नाही. मात्र, मागील एक वर्षापासून शहरात व तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. शांतता व व्यवस्था बिघडली आहे."

​ते म्हणाले, ड्रग व इतर अमली पदार्थ संगमनेर शहरात येतात कसे? कोण आहे या पाठीमागे? याचा विचार जनतेने करायला हवा. यापूर्वी असे कधीही झाले नाही, पण आता संगमनेरमध्ये हे सर्व होत आहे. "हे सर्व रोखण्याची जबाबदारी आपली आहे. राजकारणामधील मतभेद विसरून शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र या," असे भावनिक आवाहन त्यांनी शहरवासीयांना केले.

दरम्यान ​यावेळी विविध उमेदवारांनीही आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीला संगमनेर शहरातील नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !