“ढोंगी विरोधकांना संगमनेरचा विकास दिसत नाही; काय केले नाही ते सांगा!”
◻️ शांत, संयमी डॉ. सुधीर तांबे यांची घणाघाती टिका
◻️ ‘सिंह आला रे सिंह आला’ घोषणांनी शहर दुमदुमले
संगमनेर LIVE | लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात झालेल्या अभूतपूर्व विकासाचे मापदंड पूर्ण झाले असतानाही, सातत्याने खोटे बोलून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या विरोधकांवर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी पहिल्यांदाच अत्यंत परखड आणि कठोर शब्दांत टीकास्त्र सोडले. “काय केले नाही ते सांगा?" असा थेट सवाल विचारत, विरोधक ढोंगी असून त्यांना संगमनेरचा विकास दिसत नाही, अशी टीका डॉ. तांबे यांनी केली.
शांत आणि अभ्यासू नेते म्हणून ओळख असलेल्या डॉ. तांबे यांचा हा 'पहिला' कडकडाट जनतेला यावेळी अनुभवण्यास मिळाला.
विकासाचे सर्व मापदंड पूर्ण
संगमनेर सेवा समितीच्या वतीने आयोजित जाहीर सभेत डॉ. सुधीर तांबे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते.
डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांनी शहरासाठी सातत्याने निधी आणला. हायटेक बस स्थानकासह विविध वैभवशाली इमारती उभारल्या. निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन योजना राबवून नागरिकांना स्वच्छ, शुद्ध व मुबलक पाणी दररोज उपलब्ध केले. शहरात दर्जेदार रस्ते, ३५ हून अधिक सुंदर गार्डन्स आणि उत्तम सोयी-सुविधा निर्माण झाल्या. सहकारातून बाजारपेठ फुलली आणि संगमनेरची ओळख शांत, संयमी व सुसंस्कृत शहर म्हणून निर्माण झाली.
डॉ. तांबे यांनी आव्हानात्मक स्वरात विचारले, “राज्यात विकासात संगमनेर पहिल्या तीन शहरांमध्ये आहे. असे असतानाही विरोधकांना हा विकास का दिसत नाही? हे लोक ढोंगी आहेत."
आपल्या भाषणात डॉ. तांबे यांनी विरोधकांच्या खालच्या पातळीवरील राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. विरोधक केवळ फ्लेक्सबाजी करत आहेत आणि सातत्याने खोटारडेपणा पसरवत आहेत. यावेळी त्यांनी उपस्थितांना टाळ्यांचा कडकडाट करण्यास लावणारी एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. ते म्हणाले, “जेव्हा चिलट प्राणी गडबड करतात, तेव्हा सिंह बाहेर येतो." शांत आणि संयमी असलेले नेते पहिल्यांदाच इतके कडाडल्याने उपस्थितांमध्ये चैतन्य संचारले आणि संपूर्ण संगमनेर 'सिंह आला रे सिंह आला' च्या घोषणांनी दुमदुमले.
विकासात महिला व नागरिकांचा सहभाग
यावेळी बोलताना सौ. दुर्गाताई तांबे यांनी ‘स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित संगमनेर' या संकल्पनेच्या यशाचे श्रेय नागरिकांना आणि महिलांना दिले. त्या म्हणाल्या, माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांच्या नेतृत्वाखाली आपण विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवल्या. यात शहरातील नागरिक व महिलांचा मोठा सहभाग राहिला, तसेच सर्व नगरसेवक - नगरसेविकांनीही मोलाची साथ दिली, ज्यामुळे विकास शक्य झाला.
हिरालाल पगडाल यांनी शहरातील सुसंस्कृत परंपरा मोडणाऱ्या आणि जातींमध्ये भांडणे लावणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच ठेचण्याची गरज व्यक्त केली.
दिलीपराव पुंड यांनी बाळासाहेब थोरात यांनी सर्व समाजातील कार्यकर्त्याना संधी दिली आणि काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले, असे सांगितले.
इसाक खान पठाण यांनी लोकनेते थोरात यांनी समतेचे आणि सर्वधर्मसमभावाचे वातावरण जपले असून, सर्वानी त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहावे, असे आवाहन केले. तसेच इतर वक्त्यांनीही थोरात यांच्या नेतृत्वाखालील समता आणि विकासाच्या धोरणांवर भर दिला.
दरम्यान या जाहीर सभेसाठी संगमनेरमधील नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरुणांनी विविध प्रभागांमधून रॅली काढून जोरदार वातावरण निर्मिती केली.