संगमनेर शहरासाठी सेवा, सुसंवाद आणि विकासाची हमी!
◻️ डॉ. मैथिलीताई तांबेंची ‘धूळ-ट्रॅफिकमुक्त' संगमनेरची हाक
संगमनेर LIVE | उच्चशिक्षित डॉक्टर आणि सेवा समितीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. मैथिलीताई तांबे यांनी संगमनेर शहरातील ज्येष्ठ नागरिक व शहरवासीयांकडून आशीर्वाद घेत, आपण राजकारण विरहित सेवेच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवू, अशी ग्वाही दिली. विशेषतः, पुढील एका वर्षात 'ट्रॅफिकमुक्त आणि धूळमुक्त संगमनेर' हे आपले पहिले प्राधान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उच्चशिक्षण घेतलेल्या डॉक्टर असूनही साधी राहणी, नम्रपणा आणि प्रभावी सुसंवादाच्या शैलीमुळे डॉ. मैथिलीताई तांबे यांनी शहरातील नागरिकांशी अगदी आपलेपणाचे नाते जोडले आहे. याच आपुलकीतून, मेन रोड, बाजारपेठ, गणेश नगर, नवीन नगर रोडसह विविध प्रभागांमधून काढलेल्या प्रचारफेरीला नागरिकांचा मोठा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी त्यांनी ज्येष्ठ महिला नागरिक, विविध समाज घटक आणि युवकांशी थेट संवाद साधला. याप्रसंगी आमदार सत्यजीत तांबे यांच्यासह शहरातील असंख्य युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुर्गाताई तांबे यांचा वारसा पुढे नेणार
यावेळी बोलताना डॉ. मैथिलीताई तांबे यांनी माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांच्या कार्याचा गौरव केला. त्या म्हणाल्या, “दुर्गाताईंनी शहर एका कुटुंबाप्रमाणे जपले. त्यांनी ‘स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित संगमनेर' ही संकल्पना प्रभावीपणे राबवून शहरात ३५ हून अधिक गार्डन्सची निर्मिती केली. याचबरोबर स्वच्छतेमुळे संगमनेर शहराला राज्य व राष्ट्रीय पातळीवर तब्बल २७ कोटी रुपयांची बक्षिसे मिळवून दिली. याच परंपरेचा वारसा आपण पुढे चालवणार आहोत.”
‘संगमनेर 2.0' ची ब्ल्यू प्रिंट
लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीमध्ये राजकारण विरहित सर्व नागरिकांना एकत्र आणण्यात आले आहे. या सर्वाच्या सूचनांचा आदर करून 'संगमनेर 2.0' ही विकास योजना मांडण्यात आली आहे. पुढील एक वर्षात करावयाच्या कामांचे नियोजन पूर्ण झाले असून त्यांनी आपल्या ध्येयांची घोषणा केली.
यामध्ये ट्राफिक आणि धूळ मुक्त संगमनेरसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. शहर अस्थिर व असुरक्षित झाले असून, महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य हे आपले ध्येय असल्याचे सांगताना अनाधिकृत फ्लेक्स, रस्त्यावर होणाऱ्या सभा आणि व्यापाऱ्यांना होणारा त्रास यापासून शहरवासीयांना मुक्ती देण्याला पहिले प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.
युवा आणि प्रशासनात नागरिकांचा सहभाग
संगमनेर शहराचे वैभवशाली आणि गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या संस्कृतीचे वैशिष्ट्य जपण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे डॉ. तांबे यांनी सांगितले. तरुणांसाठी इनोव्हेशन सेंटर उभारले जाणार असून, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांच्या सूचनांवर तातडीने कार्यवाही केली जाईल.
दरम्यान प्रशासनामध्ये नागरिकांचा सहभाग ही अभिनव कल्पना राबवून संगमनेर शहर राज्यातील अग्रक्रमाचे शहर बनवण्यासाठी थोरात-तांबे परिवाराप्रमाणे अविश्रांत कामातून सेवा करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वास डॉ. मैथिलीताई तांबे यांनी यावेळी व्यक्त केला.