संगमनेर नगरपालिका निवडणुकीतील वाल्मिकी समाजाचा बहिष्कार मागे
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या मध्यस्थीने सकारात्मक तोडगा
संगमनेर LIVE | संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी न मिळाल्याने संतप्त झालेल्या वाल्मिकी मेहत्तर समाजाने निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार अखेर मागे घेतला आहे. आमदार अमोल खताळ यांनी शुक्रवारी सकाळी कॉलनीतील समाज बांधवांची भेट घेऊन केलेल्या मध्यस्थीनंतर, सकारात्मक चर्चा झाल्यानंतर निवडणुकीवर टाकलेला मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणुकीवर बहिष्कार..
नगरपालिका निवडणुकीत वाल्मिकी मेहत्तर समाजाला डावलण्यात आले, अशी भावना समाजात निर्माण झाली होती. यामुळे संतप्त झालेल्या समाज बांधवांनी १० नोव्हेंबरपासून कॉलनीच्या प्रवेशद्वारावरच नगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचा फलक लावला होता. यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला होता.
आमदार खताळ यांची यशस्वी मध्यस्थी..
महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी तातडीने या विषयाची दखल घेतली. शुक्रवारी सकाळी त्यांनी थेट वाल्मिकी मेहत्तर समाज बांधवांशी संवाद साधला. त्यांनी समाज बांधवांना विनंती केली की, केंद्र, राज्य आणि संगमनेरमध्ये महायुतीची सत्ता असल्याने भविष्यात समाजाला योग्य सन्मान दिला जाईल. त्यामुळे त्यांनी आपला बहिष्कार मागे घ्यावा. असे आवाहन केले.
आमदार खताळ यांच्या या सकारात्मक आश्वासनामुळे आणि विनंतीला मान देऊन, चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेला बहिष्कार समाज बांधवांनी मागे घेतला आहे.
“हा परिवार माझा आहे!" - खताळ
या भेटीनंतर आमदार अमोल खताळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “मेहत्तर वाल्मिकी समाज बांधवांमध्ये जो गैरसमज निर्माण झाला होता, तो भेटीतून दूर करण्यात आला आहे. लोकशाहीत भावना व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे."
ते पुढे म्हणाले, “वाल्मिकी समाज कायम माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला आहे. येथून पुढील काळात या समाज बांधवांना कुठलीही कमी पडू देणार नाही आणि त्यांना दिलेला शब्द मी नक्कीच पाळेन. हा परिवार माझा आहे आणि मी या परिवाराच्या पाठीमागे भक्कम उभा राहील.” अशी ग्वाही दिली आहे.