महिला शक्तीचा करिश्मा! आमदार खताळ यांच्या भेटींना उत्स्फूर्त प्रतिसाद
◻️ संगमनेर पालिका निवडणुकीत महिलाशक्ती निर्णायक ठरणार!
संगमनेर LIVE | संगमनेर नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून शहरात प्रचाराने जोरदार वेग घेतला आहे. मात्र, या सगळ्या राजकीय कोलाहलात महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या प्रचार दौऱ्याचे एक खास वैशिष्ट्य संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेत आहे. ते म्हणजे, आमदार खताळ यांना मिळणारा महिलांचा प्रचंड आणि अभूतपूर्व प्रतिसाद! 'लाडक्या बहिणी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलांचा सहभाग त्यांच्या जनसंपर्क मोहीमेचे केंद्रबिंदू ठरला आहे.
थेट संवाद, साधी भेट..
आमदार अमोल खताळ यांनी प्रभागांमध्ये पायी फिरून साध्या-सरळ नागरिकांशी थेट संवाद साधण्याची पद्धत अवलंबली आहे. चहाच्या टपरीपासून ते छोट्या दुकानांवर आणि घराच्या ओट्यांपर्यंत, प्रत्येक स्तरावरील लोकांच्या अडीअडचणी ते स्वतः उभे राहून जाणून घेत आहेत. त्यांचा हा सहज-सुलभ आणि घरगुती संवाद नागरिकांना आपलासा वाटत असल्याने त्यांच्या भेटींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
लाडक्या बहिणींची विक्रमी गर्दी..
आमदार खताळ यांच्या या जनसंपर्क मोहीमेचे सर्वाधिक वैशिष्ट्य म्हणजे महिलांची वाढती उपस्थिती. अनेक प्रभागांत आमदार खताळ आल्याची चाहूल लागताच महिलांची मोठी गर्दी जमू लागते. अनेक 'बहिणी' थेट समोर येऊन आपली मते आणि स्थानिक प्रश्न मोकळेपणाने मांडतात. यावेळी अनेक महिलांनी भरभरून कृतज्ञता व्यक्त केली.
“आमच्या लाडक्या भावाने गेल्या काही वर्षात कोणतीही अडचण सांगितल्यावर तत्परतेने ती सोडवली आहे. अनेक लहान-मोठी कामे मार्गी लावली आहेत," असे मत महिलांनी व्यक्त केले. अडचणी सांगितल्यावर त्वरित सोडवणूक होते, याच मजबूत विश्वासामुळे महिलांचा हा प्रतिसाद केवळ गर्दी नसून, तो एक निर्णायक 'जनादेश' असल्याचे मानले जात आहे.
निवडणुकीच्या ऐन तोंडावर सर्वच पक्षांनी प्रचारयंत्रणा गतिमान केली असताना, आमदार अमोल खताळ यांच्या भेटीत होणारी 'लाडक्या बहिणींची' ही विक्रमी गर्दी शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा मुख्य विषय बनली आहे. या अभूतपूर्व महिलाशक्तीच्या सहभागावरून आगामी नगरपरिषद निवडणुकीत महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.