उद्या रविवारी सायखिंडी येथे दंडकारण्य अभियानाचा आनंद मेळावा
◻️ लोकनेते बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे राहणार उपस्थिती
संगमनेर LIVE | हरितसृष्टीच्या संवर्धनासाठी थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाचा २० वर्षाचा आनंद मेळावा उद्या रविवारी दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता सायखिंडी येथे आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख सौ. दुर्गाताई तांबे यांनी दिली.
दंडकारण्य अभियानाच्या आनंद मेळाव्या बाबत अधिक माहिती देताना सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या दंडकारण्य अभियानामुळे संगमनेर तालुक्यामध्ये वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व सेवाभावी संस्था व नागरिकांनी सहभाग घेऊन हे अभियान लोक चळवळ बनवली. यामुळे अनेक उघडी बोडके डोंगर आता हिरवे दिसू लागली असून तालुक्यात हिरवाई निर्माण झाली आहे.
सायखिंडी येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या क्षेत्रामध्ये हा मेळावा होणार आहे. याप्रसंगी तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी आणि वृक्ष प्रेमी, पर्यावरण प्रेमी, महिला, युवक उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.