राज्यात “सैनिक हो तुमच्यासाठी" उपक्रमात १ हजार ५४२ अर्ज निकाली
◻️ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेला अभूतपूर्व यश
संगमनेर LIVE (लोणी) | राज्यात महसूल पंधरवडा मध्ये राबविण्यात आलेल्या “सैनिक हो तुमच्यासाठी” या उपक्रमात प्राप्त झालेल्या माजी सैनिकांच्या १ हजार ९५६ अर्जापैकी १ हजार ५४२ अर्ज निकाली काढण्यात आले असून, १५माजी सैनिकांच्या जमीन वाटप प्रकरणावर विभागाने निर्णय केला आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यात महसूल दिनाच्या निमिताने आयोजित करण्यात आलेल्या महसूल पंधरवडा मध्ये एक दिवस सैनिक हो तुमच्यासाठी या उपक्रमाचा समावेश प्राधान्याने करण्यात आला होता. यामध्ये प्राधान्याने निवृत सैनिक तसेच शहीद जवानांच्या कुटूबियांना महसूल विभागाशी संबंधित असलेल्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रथमच असा पुढाकार घेण्यात आला होता.
राज्यातील सर्व विभागांमध्ये सैनिक हो तुमच्यासाठी उपक्रमासाठी ३८३ शिबीर आयोजित करण्यात आली होती. शिबीरामध्ये प्राप्त झालेल्या १ हजार ९५६ अर्जावर तातडीने महसूल विभागाने कार्यवाही सुरू केली होती. संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा व्यक्तिशा आपण करीत होतो. यापैकी १ हजार ५४२ अर्जावर कार्यवाही होवून माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न मार्गी लागले असल्याचे समाधान मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
अनेक सैनिकांच्या कुंटूबाचे जमीनीचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित होते यापैकी १५ प्रकरण निकाली लावण्यात यश आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. माजी सैनिक किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने सैनिक हो तुमच्यासाठी उपक्रम राबविण्यात आला त्याचे यश यानिमित्ताने अधोरेखित झाले. देशासाठी सेवा करताना कौटुंबिक प्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे वर्षानुवर्ष समस्या तशाच होत्या.महसूल पंधरवड्याच्या माध्यमातून सैनिकांच्या कुंटूबियांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी योगदान देता आल्याचे समाधान मोठे असल्याची भावना मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.