निष्ठावंतांना डावलल्याने शिंदे सेनेतील महिला शहरप्रमुखांचा स्फोटक राजीनामा
◻️ आमदार अमोल खताळ यांच्यावर गंभीर आरोपांमुळे खळबळ
संगमनेर LIVE | शिंदे गटाच्या शिवसेनेतील निष्ठावंतांना डावलून 'दोन नंबर'वाल्यांना आणि अवैध धंदे करणाऱ्यांना तिकीट वाटप करण्यात येत असल्याचा सनसनाटी आरोप करत, शिंदे शिवसेनेच्या महिला आघाडी शहर प्रमुख सौ. वैशाली अशोक तारे यांनी ऐन निवडणूक धामधुमीत आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सौ. तारे यांनी आमदार खताळ यांच्या राजकारणाच्या शैलीवर जहरी टिका केली.
यावेळी महिला शहर आघाडी संघटक मनीषा पंधारे, शाखाप्रमुख वंदना भुसे, उपशहरप्रमुख ज्योती पंदारे यांच्यासह त्यांनी राजीनामा दिल्यामुळे संगमनेर शिवसेनेत (शिंदे गट) असलेली धूसफूस ऐन निवडणूकीत बाहेर आली आहे.
अहोरात्र कष्ट घेऊन प्रचार केला, पण..
२०२२ पासून आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रामाणिकपणे काम केले. आमदार खताळ यांना तिकीट मिळाले तेव्हा त्यांना कोणी ओळखत नव्हते, तरीही अहोरात्र कष्ट घेऊन आपण त्यांचा प्रचार केला. मात्र, त्यांनी सातत्याने 'सरड्याप्रमाणे रंग बदलल्याची जहरी टिका करुन नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्याना अंधारात ठेवून त्यांनी केवळ 'हप्तेखोरी'साठी तिकीट वाटप केल्याचा गंभीर आरोप तारे यांनी माध्यमांशी बोलताना केला.
कर्तृत्व शून्य आमदार..
आमदार खताळ यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करत वैशाली तारे म्हणाल्या की, आमदार खताळ हे दुसऱ्याच्या बुद्धीने चालणारे असून अजिबात कार्यक्षम नाहीत. असा गंभीर आरोप करत संगमनेरमध्ये पैशाचे राजकारण करून हिंदुत्वाची वाट लावली असून प्रवरा नदीमध्ये मोठ-मोठे क्रेन कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, हे जनतेला माहीत आहे. असा खळबळजनक दावा केला. तसेच शहरासाठी कोणताही निधी आणला नाही आणि जर निधी आणला असेल तर त्यातील 'टक्केवारीचे' काय, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
आयत्या पिठावर रेघोट्या..
संगमनेर नगर परिषदेमध्ये शिक्षित लोकांना उमेदवारी दिली आहे. याचा अर्थ त्यांना कोणताही कारभार करता येऊ नये आणि केवळ लोकप्रतिनिधीला 'टक्केवारी' मिळावी, यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले, असे तारे म्हणाल्या. तर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरासाठी सातत्याने निधी आणून विकास केला, निळवंडे धरण पूर्ण केले. मात्र, नवीन लोकप्रतिनिधी फक्त 'आयत्या पिठावर रेघोट्या मारत' आहेत. अशी जहरी टिका करताना अनेक गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.