‘भाऊ, काळजी करू नका..' आमदार खताळ यांच्या प्रभागभेटींना उत्स्फूर्त प्रतिसाद
◻️तरुणांपासून ज्येष्ठांपर्यत 'महायुती'च्या कार्यकर्त्याकडून वातावरण निर्मितीला सुरवात
संगमनेर LIVE | संगमनेर नगरपरिषदेची निवडणूक सध्या चांगलीच रंगात आली असून संपूर्ण शहरात प्रचंड उत्सुकता आणि राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या प्रभागनिहाय भेटींना नागरिकांकडून मोठा, उत्स्फूर्त आणि भावनिक प्रतिसाद मिळत आहे. तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक स्वतःहून आमदारांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी पुढे येत आहेत. भेटीदरम्यान नागरिकांनी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि कौतुक यामुळे संपूर्ण वातावरणात एक वेगळाच उत्साह आणि ऊर्जा निर्माण झाली आहे.
लोकांशी थेट संवाद, पारदर्शक कार्यशैली..
शहरातील प्रत्येक प्रभागात आमदार अमोल खताळ हे तळमळीने भेट देत असून नागरिकांच्या अडचणी, अपेक्षा आणि सूचना शांतपणे ऐकून घेत आहेत. त्यांच्या कामकाजातील पारदर्शकता, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि सहज, साधेपणाने भेटण्याची कार्यशैली यामुळे सामान्य नागरिकही भावूक होत आहेत. 'आमदार कसा असावा याचे खरे उदाहरण म्हणजे अमोल खताळ,' असे अनेक जण पुढे येऊन विश्वासपूर्वक सांगत आहेत. हा साधा आणि थेट संपर्क सामान्य मतदारांसाठी खूप महत्त्वाचा ठरत आहे.
विश्वासामुळे गर्दीचे अभूतपूर्व चित्र..
प्रभागांत होत असलेल्या भेटीदरम्यान विकास कामांचे तपशील, भविष्यातील योजना आणि शहराचा कायापालट कसा करायचा याबद्दल ते नागरिकांशी मनमोकळेपणाने चर्चा करत आहेत. विशेष म्हणजे, आमदार ज्या प्रभागात पोहोचतात, तिथे नागरिकांनी केलेली गर्दी त्यांच्या प्रति असलेल्या अतुट विश्वासाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. त्यांच्या भेटीच्या ठिकाणी निर्माण होणारा उत्साह, मोठी उपस्थिती आणि लोकांचा वाढता पाठिंबा हे शहरातील राजकीय वातावरण अधिकच 'महायुती'मय बनवत आहे.
‘आमचा विश्वास ठाम आहे!'
या भेटींमध्ये नागरिकांपैकी अनेकांनी आमदार खताळ यांना थेट सांगितले, “भाऊ, आपण काळजी करू नका… आमचा विश्वास ठाम आहे. शहरातील बहुसंख्य लोक महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशीच उभे राहतील." संगमनेरमधील ही स्पष्ट जनभावना आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद पाहता, आगामी निवडणुकीत महायुतीच्या बाजूने जोरदार वातावरण निर्मिती केली आहे.
दरम्यान विकास, संवाद आणि संपर्क यांवर आधारलेली आमदार अमोल खताळ यांची प्रभागभेट मोहीम सध्या शहरात चर्चेचा मुख्य विषय ठरली आहे.