गुंडगिरीच्या अंधारात 'सेवा समिती'ची मशाल! संगमनेरच्या शांततेसाठी तांबे यांची हाक

संगमनेर Live
0
गुंडगिरीच्या अंधारात 'सेवा समिती'ची मशाल! संगमनेरच्या शांततेसाठी तांबे यांची हाक

◻️​ ‘संगमनेर २.०' या संकल्पात सुसंस्कृत संगमनेरला 'अशांत' करणाऱ्यांना थारा नाही - आमदार सत्यजीत तांबे

​संगमनेर LIVE | ​लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुसंस्कृत आणि वैभवशाली अशी ओळख असलेले संगमनेर शहर मागील एका वर्षापासून अशांत झाले आहे. शहरात वाढलेले अमली पदार्थाचे प्रमाण आणि बिघडलेली सुरक्षितता नागरिकांसाठी मोठी चिंतेची बाब ठरली आहे. शहरात वाढलेली गुंडगिरी, दडपशाही आणि तस्करी थांबवून संगमनेरला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी 'संगमनेर सेवा समिती'चे सर्व उमेदवार कटिबद्ध राहतील, असा विश्वास आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला.

​‘संगमनेर २.०' संकल्पना घेऊन विकासाचे आश्वासन..

​संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात आमदार सत्यजीत तांबे यांनी जनता नगर, गणेश नगर, विद्यानगर, रंगार गल्ली या विविध प्रभागांमध्ये संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. यावेळी बोलताना आ. तांबे म्हणाले की, निळवंडे धरण थेट पाईपलाईन योजनेमुळे शहरात २४ तास पाणी मिळत आहे, ३५ गार्डन उभी राहिली आहेत आणि विविध वैभवशाली इमारती उभ्या आहेत. शांतता, सुरक्षितता आणि बंधुभाव हे शहराचे वैशिष्ट्य आहे.

​मागील चार वर्षापासून नगरपरिषदेत प्रशासकीय राजवट असल्याने अनेक कामे रखडली आहेत. ही कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आणि शहराच्या पुढील विकासासाठी 'संगमनेर २.०' हा नवीन संकल्प घेऊन आपण पुढील काळात काम करणार आहोत. संगमनेर सेवा समितीमध्ये राजकारण विरहित सर्व नागरिक एकत्र आले असून, हे सर्व उमेदवार शहराच्या विकासासाठी कायम कटिबद्ध राहतील.

​शहर वाचवण्यासाठी तरुण एकवटले..

​आमदार तांबे यांनी चिंता व्यक्त केली की, मागील एक वर्षापासून संगमनेर शहरामध्ये दहशत, गुंडगिरी, दादागिरी, दडपशाही आणि अमली पदार्थाची मोठी तस्करी वाढली आहे. अशा प्रकारची संस्कृती संगमनेरची कधीही नव्हती आणि ही संस्कृती कोण निर्माण करत आहे, हे आता जनतेच्या लक्षात आले आहे.

​"अशा लोकांना थांबवण्यासाठी संगमनेरकर म्हणून आपण सर्व एकत्र आलो आहोत आणि त्यामुळेच जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे.” असे आमदार सत्यजीत तांबे म्हणाले.

​संगमनेरची सुसंस्कृत राजकारणाची परंपरा टिकवण्यासाठी आणि नव्याने निर्माण झालेली दहशत, दडपशाही, अमली पदार्थाच्या तस्करीपासून शहराला वाचवण्यासाठी तरुण मोठ्या संख्येने एकवटले आहेत. तरुणांचा मोठा उत्साह सेवा समितीच्या पाठीशी उभा राहिला असून, राजकारण विरहित सेवा समिती संगमनेरकरांना भावली आहे.

​प्रचारावेळी उपस्थित प्रमुख नेते..

​नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. मैथिलीताई तांबे, दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, सीमाताई खटाटे, डॉ. अनुराधा सातपुते, किशोर टोकसे, प्रियांका शहा, अमर कतारी, प्रसाद पवार, मुजीब खान पठाण, नितीन अभंग आदी यावेळी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !