उद्या संगमनेर येथे उपमुख्यमंत्री शिंदे - पालकमंत्री विखे पाटलांची ‘जाहीर सभा’
◻️ भाजप-शिवसेनेची संयुक्त ताकद मैदानात! महायुतीच्या प्रचार तोफांना मिळणार धार
संगमनेर LIVE | संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुतीच्या प्रचाराला निर्णायक गती देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) प्रमुख नेते एकनाथ शिंदे आणि जिल्ह्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
ही सभा उद्या गुरुवारी (दि. २७) रोजी दुपारी ३ वाजता नवीन नगर रोड येथे होणार असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या सभेच्या दिशेने लागले आहे.
नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, महायुतीचे सर्व उमेदवार जोरदार जनसंपर्क साधत आहेत. आमदार अमोल खताळ, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा संदीप खताळ आणि सर्व प्रभागांतील उमेदवार मतदारांपर्यंत विकासाभिमुख योजना आणि आगामी नगरपरिषदेचा रोडमॅप प्रभावीपणे मांडत आहेत.
या प्रचारमोहिमेत महायुतीची भूमिका आणि शहराच्या भविष्याची रूपरेषा मतदारांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.
सध्याच्या उत्साही वातावरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जाहीर सभा महायुतीच्या कार्यकर्त्यासाठी आणि उमेदवारांसाठी ‘उर्जेचा नवा स्त्रोत’ ठरणार आहे. दोन्ही दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमुळे उमेदवारांना मोठा आत्मविश्वास मिळेल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान या ऐतिहासिक जाहीर सभेसाठी शिवसेना महायुतीकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून, संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विकासाच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महायुतीतर्फे करण्यात आले आहे.