‘भूमिगत गटार आणि रस्त्यांचे प्रश्न संपवा; महायुतीला सत्ता द्या!'

संगमनेर Live
0
‘भूमिगत गटार आणि रस्त्यांचे प्रश्न संपवा; महायुतीला सत्ता द्या!'

◻️ आमदार अमोल खताळ यांचे संगमनेर प्रभाग सहामधील मतदारांना आवाहन

◻️आरक्षणाचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्याची दिली ग्वाही 

​संगमनेर LIVE | ​संगमनेर नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, आमदार अमोल खताळ यांनी शहरातील प्रभाग क्रमांक सहामधील मतदारांशी थेट संवाद साधला. माजी नगराध्यक्षांचे नेतृत्व असलेल्या या महत्त्वाच्या प्रभागात अद्यापही भूमिगत गटार, रस्ते आणि अंगणवाडीसारख्या मूलभूत सुविधांचे प्रश्न प्रलंबित असल्याने खताळ यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आणि नागरिकांना महायुतीला संधी देण्याचे आवाहन केले.

​प्रलंबित प्रश्नांवर खताळ यांचे बोट..

​प्रभाग क्रमांक सहा हा तुलनेने मोठा प्रभाग आहे. या प्रभागात पूर्वी माजी नगराध्यक्षांनी नेतृत्व केले असले तरी, नागरिकांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. आमदार खताळ यांनी स्थानिक नागरिकांशी बोलताना सांगितले की, “या प्रभागामध्ये अजूनही गटारी आणि रस्त्यांचे प्रश्न कायम आहेत. रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. इंदिरानगरमधील आरक्षणाचा मोठा आणि गंभीर प्रश्नही अद्याप प्रलंबित आहे. लहान मुलांसाठी अत्यावश्यक असलेल्या अंगणवाडीची सोयदेखील झालेली नाही.

​महायुतीची ग्वाही..

​राज्यात महायुतीचे सरकार कार्यरत असल्याचा हवाला देत आमदार खताळ यांनी प्रभागातील समस्या तातडीने मार्गी लावणार असल्याचे सांगताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून इंदिरानगरमधील आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवला जाईल. नगर परिषदेची सत्ता महायुतीच्या ताब्यात दिल्यास भूमिगत गटारी, दर्जेदार रस्ते आणि अंगणवाडीची सोय हे प्रश्न निश्चित मार्गी लावण्यात येतील. “आम्ही नुसत्या पोकळ घोषणा करत नाही; तर जनतेत जाऊन त्यांचे प्रत्यक्ष काम करून दाखवतो," असे सांगत त्यांनी महायुतीच्या कामावर जनतेचा विश्वास असल्याचे स्पष्ट केले.

​प्रभागात महायुतीच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद..

​आमदार अमोल खताळ सध्या दररोज दोन प्रभागांमध्ये जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यांनी प्रभाग सहामधील शिवसेना महायुतीचे उमेदवार राहुल भोईर आणि भाजपच्या उमेदवार शोभा घुले यांच्या प्रचारार्थ मतदारांशी संवाद साधला.

​यावेळी मतदारांनी त्यांना मोठा प्रतिसाद दिला असून, प्रभाग सहामध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !