'आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार' यशवंतराव चव्हाण!
◻️ लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी उलगडल्या सहवासातील आठवणी
संगमनेर LIVE | मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा कलश घेऊन येणारे आणि महाराष्ट्रात कृषी औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रचणारे लोकनेते होते. देशाच्या आणि राज्याच्या विकासात त्यांचे अमूल्य योगदान आहे, असे गौरवउद्गार कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काढले.
यशवंतराव चव्हाण यांच्या ४१ व्या पुण्यतिथी निमित्ताने अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील यशवंत तीर्थ येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी यशवंतरावांच्या सहवासातील अनेक प्रेरणादायी आठवणींना उजाळा दिला.
महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चव्हाण साहेबांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत साधे आणि विशाल होते, यावर जोर दिला. ते म्हणाले, "यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला विकासाची नवी वाट दाखवली. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आणि सहकार, साहित्य, समाजकारण, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये दिशादर्शक काम केले."
देशाचे उपपंतप्रधान यांसारखी महत्त्वाची पदे भूषवूनही त्यांचे जीवन अत्यंत साधे होते. ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासोबतच संगमनेर तालुक्यातील विविध सहकारी संस्थांच्या वाटचालीतही त्यांचे मोठे योगदान असल्याचे थोरात यांनी यावेळी नमूद केले.
बाळासाहेब थोरात यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यासोबतच्या आपल्या वैयक्तिक सहवासाच्या आठवणींना उजाळा दिला. थोरात म्हणाले, “स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रातील राजकारण क्षेत्रासाठी मापदंड आहेत. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही काम करत आहोत. तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांच्या ६१ व्या निमित्ताने ते संगमनेरला आले होते. तसेच जोर्वे येथील निवासस्थानी सुद्धा त्यांनी भेट दिली होती." वेणूताईंच्या निधनानंतर साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे आले असता, डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी औरंगाबादपासून शिर्डी, तिथून श्रीरामपूर येथील निवासस्थानापर्यंत आणि परत औरंगाबादपर्यंतची सर्व व्यवस्था आणि जबाबदारी माझ्यावर सोपवली होती, अशी आठवण थोरात यांनी सांगितली.
अमृतवाहिनीच्या मैदानावर आयोजित सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या ६१ व्या कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमातील अलोट जनसागराचा उल्लेख यशवंतरावांनी डोळ्याचे पारणे फेडणारा कार्यक्रम असा केला होता, हे थोरात यांनी आठवले.
नरिमन पॉईंट येथे त्यांच्या निधनानंतर एका अत्यंत लहान घरामध्ये त्यांचे शेवटचे दर्शन घेतले, अशी भावूक आठवणही त्यांनी सांगितली. "अत्यंत मोठे पण साधे व्यक्तिमत्त्व असलेल्या या माणसाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा कळस आणला. त्यांचे आदर्श जीवन कार्य महाराष्ट्रातील सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी ठरत राहील," असे थोरात म्हणाले.
यावेळी संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख यांनीही यशवंत तीर्थावर दरवर्षी विविध नामवंत व्याख्याते, साहित्यिक व कवींच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात येत असल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनीही यावेळी चव्हाण साहेबांना आदरांजली वाहिली.
यावेळी संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य प्रा. व्ही. बी. धुमाळ, डॉ. राजेंद्र वाघ, डॉ. मच्छिंद्र चव्हाण यांच्यासह अमृतवाहिनीतील विविध विभागांचे विभाग प्रमुख आणि शिक्षक उपस्थित होते.