अयोध्या राममंदिर भारतीय अस्मितेचे प्रतीक!
◻️ मोदींनी फडकावलेला भगवा ध्वज हा हिंदू संस्कृतीचा सन्मान - मंत्री विखे पाटील
संगमनेर LIVE (शिर्डी) | जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर हे भारतीय अस्मितेचे प्रतीक असल्याचे सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरावर फडकावलेला भगवा ध्वज हा हिंदू धर्माच्या संस्कृती आणि परंपरेचा सन्मान असल्याची भावूक प्रतिक्रिया त्यांनी शिर्डी येथे व्यक्त केली.
माध्यमांशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत आयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिरावर झालेला ध्वजारोहण सोहळा संपूर्ण विश्वात हिंदू धर्माच्या संस्कृती आणि परंपरेचा संदेश देणारा आहे." त्यांनी पुढे नमूद केले की, आजचा दिवस देशाच्या अध्यात्मिक परंपरेसाठी ऐतिहासिक क्षण ठरला आहे. मंदिर निर्माणाचे पूर्ण झालेले काम आणि कळसावर भगवा ध्वज फडकावण्याचा हा मंगलमय सोहळा निश्चितच ऊर्जा देणारा आहे.
अयोध्या प्रकरणावर बोलत असतानाच मंत्री विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या राजकारणावरही सडेतोड भाष्य केले.
या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. “काँग्रेस या निवडणुकीतून हद्दपार झाली आहे. महाविकास आघाडीला (मविआ) जिल्ह्यात उमेदवार उभे करता आले नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर स्थानिक पातळीवर आघाड्या करून लढण्याची वेळ आली आहे," असे विखे पाटील म्हणाले.
श्रीरामपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या उमेदवाराचा विजय निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, कोपरगावच्या निवडणुकीबाबत बोलताना, "निवडणुका लढताना संयम आवश्यक असतो, उथळपणा चालत नाही," या आपल्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
'लाडकी बहीण योजने'बाबत महायुतीमधील मंत्री किंवा नेत्यांकडून होणार्या वक्तव्यांकडे लक्ष वेधले असता, विखे पाटील यांनी या योजनेच्या भवितव्याबद्दल महत्त्वाची माहिती दिली. “या योजनेवर नेत्यांकडून होणारी वक्तव्य हा महायुतीच्या धोरणाचा भाग आहे, ज्यातून ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, याचा विश्वास मिळत आहे," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.