राहाता नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत मंत्री विखे पाटलांचे शक्तीप्रदर्शन!
◻️ शहराच्या सर्वागीण विकासासाठी ४०० कोटी, पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
संगमनेर LIVE (राहाता) | मोठ्या कालावधीनंतर होत असलेल्या राहाता नगरपरिषदेच्या निवडणुकीमुळे शहरात सध्या चांगलाच उत्साह संचारला आहे. याच उत्साहाला अधिक धार देण्यासाठी जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहराच्या विविध प्रभागांमध्ये नागरीकांच्या भेटीगाठी घेऊन थेट संवाद साधला.
राहाता शहरात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित या भेटीदरम्यान मंत्री विखे पाटील यांनी मतदारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि शहराच्या भविष्यातील विकासाची रूपरेषा स्पष्ट केली.
मंत्री विखे पाटील यांनी यावेळी बोलताना, शहराच्या सर्वागीण विकासासाठी निधी कुठेही कमी पडू दिला नाही, असे ठामपणे सांगितले. शहराच्या पायाभूत सुविधांवरील समस्या सोडविण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. राज्यात महायुतीचे सरकार कार्यरत असल्याने शहर विकासाचे निर्णय त्वरित घेतले जात आहेत. भविष्यातही शहरासाठी अधिक काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
शहर विकासाच्या प्रक्रियेला गती देण्याचा आपला निरंतर प्रयत्न सुरू आहे. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून शहराचा पाण्याचा प्रश्न दूर करण्यात यश आले असून, गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणासाठी ४०० कोटी रूपयांचा विक्रमी निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच शहराचा महत्त्वाचा जलशुद्धीकरण प्रकल्पही कार्यान्वित होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
शिर्डी या भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याचे काम सुरू आहे. शिर्डी येथे सुरू होत असलेली औद्योगिक वसाहत (MIDC) आणि त्यातून निर्माण होणारे नवीन उद्योग, हा राहाता आणि परिसराच्या विकास प्रक्रियेतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी यावेळी नमूद केले.