राहुरी नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपचा बुवासिंद बाबा मंदिरातून शंखनाद!

संगमनेर Live
0
राहुरी नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपचा बुवासिंद बाबा मंदिरातून शंखनाद!

◻️ नगरपरिषद निवडणुकीचा निकाल शंभर टक्के आपल्या बाजूने लागणार - डॉ. सुजय विखे पाटील

संगमनेर LIVE (​राहुरी) | ​राहुरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा उत्साही शुभारंभ आज, मंगळवारी, शहरातील ऐतिहासिक बुवासिंद बाबा मंदिर परिसरात मोठ्या दिमाखात पार पडला. शहरातील असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक यांच्या अभूतपूर्व उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम भाजपाच्या एकजुटीचे आणि दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यावरील दृढ विश्वासाचे दर्शन घडवणारा ठरला.

​माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह भाजपाचे सर्व उमेदवार, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते.

​याप्रसंगी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहुरी शहरातील जनतेचा भाजपवर असलेला विश्वास अधोरेखित केला. ते म्हणाले, "सर्व कार्यकर्त्यांनी संघटितपणे, प्रामाणिकपणे आणि जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून काम केल्यास, राहुरी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल हा शंभर टक्के आपल्या बाजूने लागणार आहे.”

विखे पाटील पुढे म्हणाले की, दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी शहरात सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली. "कर्डिले साहेबांच्या कार्याची पावती, त्यांच्यावर असलेला लोकांचा प्रेमभाव आणि त्यांच्या नेतृत्वावरील दृढ विश्वास या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून येईल."

कर्डिले यांच्या अपूर्ण राहिलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी आणि राहुरीच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी नगरपरिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले.

​अक्षय कर्डिले यांनी उपस्थितांना भावनिक साद घातली. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या अनुपस्थितीत हा प्रचाराचा शुभारंभ करावा लागतोय, ही कल्पनाही आम्ही केली नव्हती, असे सांगताना ते गहिवरले. ते म्हणाले, "पण त्यांच्या स्वप्नांचे ओझे आज आपल्या सर्वाच्या खांद्यावर आहे. राहुरीत त्यांनी जे व्हिजन ठेवले होते, ते आजही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात जिवंत आहे.”

साहेबांची अनेक वर्षापासूनची एकच तीव्र इच्छा होती ‘राहुरी नगरपरिषदेवर भारतीय जनता पक्षाचा भगवा फडकला पाहिजे.’ आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांच्या त्या इच्छेची पूर्तता करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. राहुरी शहराचा विकास, नागरिकांची प्रगती आणि शहराचे सुशासन सुनिश्चित करणे हे आपले कर्तव्य आहे,” असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान ​कार्यक्रमाच्या समारोपात “जय भवानी, जय शिवराय”, “भारतात माता की जय” आणि “भाजपाचा विजय असो” अशा गगनभेदी घोषणांनी बुवासिंद बाबा मंदिर परिसर अक्षरशः दुमदुमून गेला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !