बाळासाहेब थोरात, सत्यजीत तांबेंच्या नेतृत्वात संगमनेर सेवा समितीचे उद्या ‘शक्ती प्रदर्शन’
◻️ २० नवीन व ११ अनुभवी उमेदवारांना संधी; लालबहादूर शास्त्री चौकात होणार भव्य जाहीर सभा
संगमनेर LIVE | ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाच्या वाटेवर अग्रगण्य ठरलेल्या संगमनेर शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. 'संगमनेर सेवा समिती'च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या, रविवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी शहरभर भव्य प्रचार रॅली आणि सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रचार कार्यक्रमासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात आणि युवा नेते आमदार सत्यजीत तांबे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यांच्यासोबत डॉ. जयश्रीताई थोरात आणि डॉ. मैथिलीताई तांबे देखील सहभागी होणार आहेत.
'संगमनेर २.०' व्हिजनला प्रचंड पाठिंबा
संगमनेर सेवा समितीने यंदाच्या निवडणुकीत 'संगमनेर २.०' हे विकासाचे व्हिजन घेऊन निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. या व्हिजनसाठी समितीने निवडणुकीच्या मैदानात २० नवीन तरुण चेहरे आणि ११ अनुभवी चेहऱ्यांना संधी दिली आहे. सर्व सामान्यांसाठीच्या या व्हिजनला संगमनेरमधील नागरिक, तरुण आणि महिलांचा मोठा पाठिंबा मिळत असून, विविध प्रभागांमधून उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे.
भव्य प्रचार रॅलीचा मार्ग
उद्या (रविवार) दुपारी ठीक ३ वाजता युवकांची ही भव्य रॅली 'जाणता राजा मैदान' येथून सुरू होईल. शहराच्या मध्यवर्ती भागातून मार्गक्रमण करताना ही रॅली राजपाल चौक, बस स्टॅन्ड, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अशोक चौक, चावडी, मेन रोड, गवंडीपुरा, सय्यद बाबा चौक, तेलीखुंट, बाजारपेठ मार्गे रॅली जाणार आहे.
रॅलीचा समारोप लालबहादूर शास्त्री चौकात
रॅलीच्या समारोपणानंतर लालबहादूर शास्त्री चौक येथे सायंकाळी ५.०० वाजता या भव्य जाहीर सभेला सुरुवात होईल. या सभेत बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे संगमनेरच्या भविष्यातील विकासाची दिशा स्पष्ट करणार आहेत.
दरम्यान संगमनेर सेवा समितीने शहरातील सर्व युवक, नागरिक आणि महिलांना मोठ्या संख्येने या प्रचार रॅली आणि जाहीर सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.