श्री क्षेत्र नारायणपूर येथे २ व ३ डिसेंबर रोजी दत्त जयंतीचा भव्य सोहळा!
◻️ संगमनेर डेपोकडून भाविकांसाठी खास ‘गाव तेथे एसटी' सेवा
संगमनेर LIVE | प. पू. श्री नारायण महाराज यांचे आशीर्वाद आणि प. पू. श्री टेंबे स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र नारायणपूर येथे यावर्षी दत्त जयंतीचा भव्य-दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. २ आणि ३ डिसेंबर २०२५ या दोन दिवसांसाठी चालणाऱ्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील दत्त सेवकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.
दिंडी आणि ज्योत सोहळ्याचे उत्साहात प्रस्थान
दत्त जयंतीच्या या महासोहळ्यासाठी तयारी सुरू झाली असून, भाविकांचे जत्थे नारायणपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी मोफत पायी दिंडी सोहळा अगोदरच श्री क्षेत्र नारायणपूरकडे प्रस्थान झाला आहे. याशिवाय, १ डिसेंबर २०२५ रोजी जवळे कडलग येथून ज्ञानदेव माऊली देशमुख यांच्या निवासस्थानापासून तरुणाईच्या पुढाकाराने भव्य दिव्य पायी ज्योतीचे आयोजन करण्यात आले आहे.
भाविकांसाठी खास एसटीची सोय
या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राज्यातील आणि विशेषतः सिन्नर, संगमनेर, आणि अकोले विभागातील भाविकांची सोय व्हावी म्हणून संगमनेर डेपोद्वारे एक महत्त्वपूर्ण योजना राबवली जात आहे. ‘गाव तेथे एसटी सेवा' या उपक्रमाद्वारे, ज्या गावांतून साधारणतः ३५ ते ४० आसनांचे (सीट) गट तयार होतील, त्यांच्यासाठी थेट गावातून बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान जास्तीत जास्त भाविकांनी या एसटी सुविधेचा लाभ घेऊन श्री दत्त महाराजांच्या चरणी आपली सेवा रुजू करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सर्व भक्तांनी प. पू. सदगुरु टेंबे स्वामी यांचे प्रवचन व दर्शन घेऊन, हा ऐतिहासिक दत्त जयंतीचा सोहळा याची देही याची डोळा बघावा आणि जीवन कृतकृत्य करावे, असे आवाहन सिन्नर, संगमनेर, अकोले विभागातील सर्व दत्त सेवेकरी शिष्यमंडळाने केले आहे. अशी माहिती पत्रकार संजय गोपाळे यांनी कळवली आहे.