निमगाव खुर्द येथे बिबट्यांच्या हल्ल्यात सात महिन्यांची कालवड ठार!
◻️ ‘बंदिस्त' गोठ्यात बिबट्याचा शिरकाव; बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी
संगमनेर LIVE | संगमनेरसह ग्रामीण भागामध्ये बिबट्याच्या संख्येत झालेली मोठी वाढ आता नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतीत काम करणाऱ्या महिला, शेतकरी आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, बिबट्यांनी आता आपले लक्ष थेट शेतकऱ्यांच्या पशुधनाकडे वळवले असून, रात्रीच्या वेळी गोठ्यांमध्ये घुसून हल्ले करण्याची हिंमत बिबटे दाखवत आहेत.
निमगावात साखळी हल्ले; रात्री ११.३० वाजता थरार
संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द परिसरात गेल्या महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्यांची जणू साखळीच सुरू झाली आहे. चार ते पाच ठिकाणी बिबट्यांनी गोठ्यांवर हल्ले करून गायी, वासरे, शेळ्या आणि कालवडींना लक्ष्य केले आहे. या साखळी हल्ल्यांमुळे शेतकरी आधीच धास्तावलेले असताना, काल रात्री घडलेल्या घटनेने दहशतीचे वातावरण शिगेला पोहोचले आहे.
निमगाव खुर्द येथील शेतकरी साहेबराव पुंजा कासार यांच्या घरात काल रात्री (सुमारे ११.३० वाजता) बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला. साहेबराव कासार यांचा गाईचा गोठा घरासमोर असून, तो व्यवस्थित बंदिस्त होता. तरीही, बिबट्याने थेट गोठ्यात प्रवेश केला आणि अंदाजे ७ ते ८ महिन्यांच्या कालवडीवर हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात बिबट्याने त्या कोवळ्या कालवडीचा मूडदा पाडला केले. घराच्या अगदी समोर, बंदिस्त गोठ्यात बिबट्याच्या शिरकावामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तातडीने पिंजरा लावण्याची मागणी
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत कालवडीचा पंचनामा करून नुकसानीची नोंद घेतली आहे. मात्र, बिबट्याची वाढती हिंमत आणि माणसांच्या वस्तीत होणारे हल्ले पाहता, वन विभागाने कोणतीही दिरंगाई न करता या भागात तातडीने पिंजरा लावून हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करावे, अशी आग्रही मागणी साहेबराव कासार यांच्यासह परिसरातील सर्व स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. अशी माहिती पत्रकार संजय गोपाळे यांनी कळवली आहे.