गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या ‘शांतिनिकेतन’च्या समकक्ष मांचीहिल शैक्षणिक संकुल!
◻️ ग्रामीण कवी इंद्रजीत भालेराव यांचे गौरवोद्गार
◻️ मांचीहिल संकुलात विद्यार्थ्याच्या गुणात्मक आणि सर्वागीण विकासावर भर
संगमनेर LIVE | आजच्या काळात शिक्षण संस्था किंवा शाळा फक्त गुणांवर (मार्कावर) लक्ष केंद्रित करत असताना, विद्यार्थ्याना सर्वागाने आदर्श घडवणारी 'मांचीहिल शिक्षण संस्था' खऱ्या अर्थाने शिक्षणाचा नवा अध्याय लिहीत आहे. सुप्रसिद्ध ग्रामीण कवी इंद्रजीत भालेराव यांनी संस्थेच्या कार्याचे महत्त्व स्पष्ट करत थेट गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या जगप्रसिद्ध 'शांतिनिकेतन' शाळेच्या समकक्ष ही शाळा असल्याचे गौरवोद्गार काढले.
संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक संकुलातील ज्ञानगंगा विद्यानिकेतनच्या प्रांगणात आयोजित काव्यधारा कार्यक्रमात कवी इंद्रजीत भालेराव बोलत होते. संस्थेचे संस्थापक अॅड. शाळीग्राम होडगर, संचालिका नीलीमा गुणे, विजय पिसे, अण्णासाहेब बलमे, सुनील आढाव, किसन हजारे, गंगाधर चिधें, योगीता दुकळे, प्रा. प्रदीप जगताप यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
टागोर यांच्या शिक्षण परंपरेचे मांचीहिल संकुल..
कवी भालेराव यांनी यावेळी रविंद्रनाथ टागोर यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनाची आठवण करून दिली. प्रचलित शाळांमध्ये शिक्षण न घेतलेल्या टागोर यांनी 'गीतांजली'सारखा काव्यसंग्रह लिहून नोबेल पारितोषिक मिळवले. त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर सर्वागीण विकासावर लक्ष केंद्रित करून शांतिनिकेतनची स्थापना केली. विशेष म्हणजे, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी या शांतिनिकेतनच्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या, ज्याचे आज विद्यापीठात रूपांतर झाले आहे. भालेराव यांनी मांचीहिल संकुलाला याच 'शांतिनिकेतन'च्या परंपरेतील शिक्षण संस्था असल्याचे प्रमाणपत्र दिले.
गुणांपेक्षा गुणात्मक विकासावर भर..
मांचीहिल संकुलात अध्यात्म, शिक्षण, उद्योग, अभिनय आणि विज्ञान आदि विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. गुणांच्या (मार्क) मागे असलेल्या शाळांना पालकांची पसंती मिळत असताना, मांचीहिल शैक्षणिक संकुल विद्यार्थ्याचा सर्वागाने विकास साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. येथील विद्यार्थी भाग्यवान आहेत, कारण त्यांना गुणांपेक्षा चारित्र्य आणि आदर्श जीवनमूल्ये शिकवली जात आहेत, असे मत कवी भालेराव यांनी व्यक्त केले.
कवींनी सादर केल्या लोकप्रिय कविता..
कार्यक्रमादरम्यान इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या भावना थेट ग्रामीण भाषेतून विद्यार्थ्यासमोर मांडल्या. त्यांनी सादर केलेल्या “शेतामधी माझी घोप, तिला बोराटीचा झाप, इंथ राबतो, कष्टतो माझा शेतकरी बाप” तसेच “माझी एक गाय होती” आणि “काळया बापाचं हिरवं रान, काळ्या आईनं पिकवल सोनं, त्यांच्या घामाचा लय भाव सस्ता, माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता” अशा अनेक गाजलेल्या कविता सादर केल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये मोठा उत्साह संचारला. त्यामुळे विद्यार्थ्यानीही त्यांच्या सादरीकरणामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
कवी इंद्रजीत भालेराव यांनी शब्दांची जुळवाजुळव करताना ग्रामीण जीवनातील सखोल संवेदना, मातीचा सुगंध आणि तिथल्या जगण्याची धडपड कवितेतून प्रभावीपणे उलगडली. त्यांच्या काव्यातून शेतकऱ्यांच्या नशिबी आलेला संघर्ष, शेतकरी बापाच्या घामाचे मोल आणि खेड्यातील साधेपणा आणि अस्सल जीवन कवीतेचे सादरीकरण करुन विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवले.
दरम्यान या काव्यमय सादरीकरणाने मांचीहिल संकुलातील वातावरण भारावून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले. विशेष म्हणजे याप्रसंगी अॅड. शाळीग्राम होडगर यांनी विद्यार्थ्यामध्ये बसून हा संपूर्ण कार्यक्रम पाहिला.