‘सैराट' फेम 'परश्या' तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक!
◻️ अभिनेता आकाश ठोसरने घेतले देवीचे दर्शन
संगमनेर LIVE (तुळजापुर) | मराठी चित्रपटसृष्टीतील 'सैराट' चित्रपटातून घराघरात पोहोचलेला आणि तरुणाईचा लाडका अभिनेता आकाश ठोसर याने आज सकाळी भक्तीभावाने श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. आपल्या अभिनयाने महाराष्ट्राला वेड लावणारा 'परश्या' आज आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आला होता.
ठोसर यांनी पारंपरिक पद्धतीने देवीची पूजा-अर्चा केली. त्यांनी मनोभावे श्री तुळजाभवानी देवींची ओटी भरली आणि आरती करून देवीचे दर्शन घेतले. या वेळी मंदिर परिसरात त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.
या भेटीदरम्यान, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने सहायक जनसंपर्क अधिकारी उमाकांत क्षीरसागर यांच्या हस्ते आकाश ठोसर यांचा सन्मान करण्यात आला. क्षीरसागर यांनी ठोसर यांना श्री तुळजाभवानी देवींची सुंदर प्रतिमा भेट देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी मंदिर संस्थानचे इतर कर्मचारी देखील उपस्थित होते.