संगमनेरच्या कामगार रुग्णालयाचा तिढा सुटणार!
◻️ हिवाळी अधिवेशनात विशेष बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याची नामदार विखे पाटलांची ग्वाही
संगमनेर LIVE | जलसंपदा आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर येथील कामगार रुग्णालयाच्या प्रलंबित समस्येवर तोडगा काढण्याची ग्वाही दिली आहे. येणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात एक विशेष बैठक घेऊन कामगार रुग्णालयाचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लावू, असे आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिले.
यावेळी त्यांनी मालपाणी उद्योग समूहातील अधिकारी आणि कामगार वर्गाची भेट घेतली आणि त्यांना महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. आमदार अमोल खताळ आणि उमेदवार सुवर्णा खताळ यांच्यासह अनेक मान्यवर या भेटीवेळी उपस्थित होते.
वैयक्तिक पाठपुरावा करणार
कामगार रुग्णालयाच्या मागणीचे निवेदन यावेळी मंत्री विखे पाटील यांना देण्यात आले. या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन मी स्वतः यात लक्ष घालून व्यक्तिगत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कामगारांसाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे हे महायुती सरकारचे प्राधान्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मालपाणी समूहाशी जुने स्नेहबंध
मालपाणी उद्योग समूहात आल्यानंतर आपल्याला आपल्या परिवारात आल्यासारखे वाटले, अशा भावना नामदार विखे पाटील यांनी व्यक्त केल्या. स्व. सहाणे मास्तर यांच्यामुळे आपला स्नेह वाढला. तसेच, स्व. ओंकारनाथ मालपाणी आणि स्व. बाळासाहेब विखे यांच्यातील ऋणानुबंध सर्वश्रुत होता. त्यांच्या पश्चात राजेश मालपाणी आणि संजय मालपाणी यांनी या उद्योग समूहाची धुरा अत्यंत यशस्वीपणे पुढे नेल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
कामगारांसाठी लाडकी बहीण आणि आयुष्मान भारत योजना
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कामगारांसाठी राबवल्या जात असलेल्या विविध योजनांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. ‘लाडकी बहीण' योजना बंद करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण सरकारची एकही योजना बंद झाली नाही. आयुष्मान भारत योजनेतून बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहराच्या विकासासाठी महायुतीला साथ द्या
संगमनेर शहराच्या सर्वागीण विकासाचे परिवर्तन करताना नागरिकांच्या जीवनाला विकासाची प्रक्रिया पोषक ठरेल, यासाठी महायुतीची टीम काम करेल, अशी हमी त्यांनी दिली. विधानसभेत परिवर्तन घडविण्यात तुमचे योगदान मोठे आहे. आता नगरपालिकेतही परिवर्तन घडवून आणण्यासाठी साथ देण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी उपस्थित कामगार वर्गाला केले.
दरम्यान यावेळी आमदार अमोल खताळ, उद्योगपती राजेश मालपाणी, डाॅ. अशोक इथापे, कामगार नेते माधव नेहे, ज्ञानेश्वर सहाणे, उमेदवार सुवर्णा खताळ आदी उपस्थित होते.