अत्याधुनिक कॅथलॅब युनिटमुळे रुग्णांना मोफत व तातडीने उपचार मिळणार

संगमनेर Live
0
अत्याधुनिक कॅथलॅब युनिटमुळे रुग्णांना मोफत व तातडीने उपचार मिळणार 

◻️ डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा रुग्णालयात लोकार्पण


संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब युनिटचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या युनिटचे उद्घाटन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. 

डॉ. विखे म्हणाले, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन निधीतून सिव्हिल हॉस्पिटल साठी वेगवेगळ्या कारणाने ७५ कोटी रुपयांचा निधी अहिल्यानगरसाठी मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सहकार्यामुळे जिल्ह्याच्या जनतेसाठी ही आरोग्यसेवेची मोठी भेट मिळाली आहे.

त्यांनी पुढे सांगितले, महायुती सरकारने आरोग्यसेवा, शिक्षण आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात जेवढं काम केलं ते मागील काही वर्षांत कधीच झालं नव्हतं. जिल्हा रुग्णालय हे गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या आरोग्यसेवेत कार्यरत असून कोविड काळात या रुग्णालयाने उल्लेखनीय सेवा बजावली. त्या काळात अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यात सिव्हिल हॉस्पिटलने मोलाची भूमिका बजावली. याच अनुभवातून प्रेरणा घेऊन, आज अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब युनिट सुरू करण्यात आले आहे.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी या प्रसंगी सांगितले की, सरकारतर्फे उपलब्ध होत असलेल्या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांनाही हृदयरोगावरील उच्च दर्जाच्या उपचारांची सुविधा मोफत मिळावी हा हेतू या युनिटमागे आहे. पूर्वी खाजगी रुग्णालयांमध्ये कराव्या लागणाऱ्या महागड्या तपासण्या आणि उपचार आता जिल्हा रुग्णालयात सुलभ आणि मोफत मिळणार आहेत. ही सेवा जनतेसाठी एक मोठी दिलासा ठरणार आहे. ते पुढे म्हणाले, आज महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याला १८ कोटी रुपयांची आरोग्य सुविधा अर्पण केली आहे. पुढील काळातही आम्ही एकजुटीने राहून अहिल्यानगरच्या विकासासाठी प्रत्येक योजना पूर्ण करू.

आमदार संग्राम जगताप म्हणाले, जिल्हा रुग्णालयात सुरू झालेल्या या अत्याधुनिक युनिटमुळे जिल्ह्यातील हजारो हृदयरुग्णांना नवीन जीवनदान मिळेल. शासनाच्या मदतीने आणि जनतेच्या पाठबळावर आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे.

या कॅथलॅब युनिटमुळे हृदयरोग निदान व उपचार यासाठी लागणारी सर्व आधुनिक यंत्रणा उपलब्ध झाली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह इतर शासकीय योजनांमधूनही नागरिकांना या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

डॉ. विखे यांनी आपल्या भाषणात विद्यमान खासदार निलेश लंके यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली. ते म्हणाले, “मागच्या एका वर्षात मी जेवढं काम केलं, त्याच्या दोन टक्के सुद्धा काम आजच्या खासदाराने केलं नाही. माझा पराभव झाला, पण मी जनतेसाठी थांबलो नाही. जनतेला काही लोकांच्या भरोशावर सोडणं योग्य नाही. आम्ही थांबलो असतो तर जिल्ह्याचा विकासच थांबला असता. तसेच अहिल्यानगर शहरात ५११ एकर मधे एमआयडीसी उभारण्याचा आमचा निर्धार आहे. जमीन दिली आहे, सातबाऱ्यावर बोजा चढवला आहे. न्यायालयीन अडथळे असूनही पुढील सहा महिन्यांत एमआयडीसी सुरू होईल. अशा विश्वास यावेळी दिला. 

वैद्यकीय महाविद्यालयाबाबत स्पष्ट शब्दांत ते म्हणाले, “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना नगर शहरातच होईल. दुसरीकडे नेण्याचा प्रश्नच नाही. हा शब्द मी राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने देतो. 

शेवट भाषणात डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले आगामी काही दिवसांत आम्ही दहा कोटी रुपयांच्या खर्चाने महिला प्रशिक्षण केंद्र उभारणार आहोत. या केंद्रात शहरी आणि ग्रामीण महिलांना बचत गटांमार्फत रोजगार प्रशिक्षण दिलं जाईल, जेणेकरून त्या स्वावलंबी बनतील.

आपल्या भाषणाच्या शेवटी डॉ. विखे म्हणाले, मतदान ही लोकशाहीची ताकद आहे. चुकीचा माणूस निवडला तर आपल्या मुलांचं भविष्य धोक्यात येईल. विकास करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभं राहा. हा संघर्ष सत्तेसाठी नाही, तर तुमच्या भवितव्यासाठी आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !