कॉग्रेसला धक्का! ॲड. समिन बागवान यांचा सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश
◻️ मंत्री विखे पाटलांकडून श्रीरामपूरमध्ये कॉग्रेसला खिंडार!
◻️ बाळासाहेब थोरात आणि डॉ. तांबे यांच्या हातून विश्वासू ‘मोहरा’ निसटला!
संगमनेर LIVE (श्रीरामपूर) | कॉग्रेस ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच डॉ. सुधीर तांबे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे ॲड. समिन बागवान यांनी काल, गुरुवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अविनाश आदिक यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत (भाजप) जाहीर प्रवेश केला. श्रीरामपूर आणि जिल्हा कॉंग्रेससाठी हा एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
कॉंग्रेसमध्ये सक्रिय भूमिका, तरीही ‘अन्याया’मुळे नाराजी
गेल्या अनेक वर्षापासून ॲड. बागवान हे कॉग्रेस पक्षात एकनिष्ठ आणि प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे उत्कृष्ट संघटन कौशल्य आणि प्रभावी वक्तृत्व असल्याने त्यांनी २०१५ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कॉग्रेस उमेदवारांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. मात्र, नगरपालिका निवडणुकीच्या वेळी पक्षश्रेष्ठींकडून योग्य दखल न घेतल्याने आणि अन्याय झाल्याच्या भावनेतून ते नाराज होते.
सर्वसमावेशक भूमिकेमुळे भाजपला पसंती
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या भारतीय जनता पक्षाच्या दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक आणि शेतकरी यांच्या बाबतीत असलेल्या सर्वसमावेशक भूमिकेने ॲड. बागवान प्रभावित झाले. अल्पसंख्याक समाजाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी एक उत्तम समन्वयक म्हणून काम करण्याचा आणि आपल्या उच्च शिक्षणाचा फायदा कायदेशीर, सामाजिक, राजकीय व वैद्यकीय सेवा भाजपच्या माध्यमातून समाजाला मिळवून देण्याचा मानस ठेवून त्यांनी पक्षात प्रवेश केला.
यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ॲड. बागवान यांच्या प्रवेशाबद्दल आनंद व्यक्त केला आणि त्यांना निश्चितपणे न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
ॲड. बागवान यांच्यासोबत अनेक सहकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर पक्षासोबत जोडला जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. ॲड. बागवान यांच्या प्रवेशामुळे श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक दोन (वार्ड नंबर दोन) तसेच संजय नगर भागातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष नीतीन दिनकर, दीपक पटारे, इंद्रनाथ थोरात, संजय फंड, श्रीनिवास बिहानी, रवी पाटील, केतन खोरे, आशिष धनवटे, नारायण डावखर, मुख़्तार शाह, नजीर मुलानी, महेबुब कुरैशी, हाजी इस्माइल, मोहसिन शेख, मेहबूब प्यारे, मुदस्सर शेख, तौफीक शेख, शरद नवले, अभिषेक खंडागळे, नाना शिंदे, नीतिन भागडे, दिपक चव्हाण, विराज भोसले, बंडु शिंदे, राहुल आठवले आदी उपस्थित होते.