संगमनेरमध्ये प्रचार सांगता दिनी महायुतीची ‘झंझावाती रॅली!’
◻️ खासदार डॉ. श्रीकांत शिंदेकडून ‘विकासनाम्याला' शंभर टक्के पाठबळ देण्याची ग्वाही
◻️ नगराध्यक्षासह इतर उमेदवाराच्या प्रचारार्थ हजारो तरुण रस्त्यावर
संगमनेर LIVE | महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करून शहराच्या विकासाला पाठबळ द्या. आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली जनतेसाठी तयार करण्यात आलेल्या विकासनाम्याला महायुती सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी महत्वपूर्ण ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संगमनेर येथे दिली.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हजारो युवकांच्या सहभागाने महायुतीच्या प्रचार रॅलीने शहरात जोरदार झंझावात निर्माण केला. या प्रचारानिमित्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांच्यासह शहरातील पंधरा प्रभागातील तीस उमेदवारांच्या भेटीसाठी खा. शिंदे यांनी विविध प्रभागांमध्ये जाऊन मतदारांना अभिवादन केले.
सकाळी अकरा वाजता खासदार श्रीकांत शिंदे यांचे संगमनेर महाविद्यालयाच्या हेलीपॅडवर आगमन झाले. आमदार अमोल खताळ आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी तसेच उपस्थित असलेल्या हजारो युवकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पुणे-नाशिक महामार्गावरून निघालेल्या या रॅलीत महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांनी भगवे झेंडे घेऊन सहभाग नोंदवला.
उपनगरातील सर्व प्रभागांमध्ये प्रचार रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. सुयोग कॉलनी, मालदाड रोड, जनता नगर, इंदिरा नगर, बस स्थानक आणि गावातील सर्व प्रमुख मार्गांवरून निघालेल्या रॅलीत ठिकठिकाणचे कार्यकर्ते सहभागी होत होते.
संगमनेर तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने विधानसभा निवडणुकीत आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून परिवर्तन घडवले. विकासाच्या दृष्टीने हे परिवर्तन महत्त्वाचे असून, तीच परिस्थिती आता नगरपालिकेच्या निवडणुकीतही आहे. शहरातील सर्व मतदार महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वास खासदार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीने अखेरच्या टप्प्यात मोठी आघाडी घेतली आहे. शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारसभांनी महायुतीच्या प्रचारात मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
मागील पंधरा दिवसांपासून शहरातील प्रत्येक प्रभागात मतदारांच्या भेटी घेऊन, प्रचार रॅली आणि कॉर्नर सभा घेऊन आमदार अमोल खताळ यांनी प्रचारात झंझावात निर्माण केला आहे. शहराचा विकासनामा जनतेसमोर मांडताना आमदार खताळ यांनी, राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून शहराच्या विकासकामांना अधिक निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही दिली.
दरम्यान आमदार खताळ यांनी कॉटेज रुग्णालय पूर्ण करणे, शहरातील आरक्षण उठविण्याचा प्रश्न मार्गी लावणे, महत्त्वाकांक्षी जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करणे, शहरात औद्योगिक वसाहत निर्माण करणे. अशी आश्वासने प्रचारादरम्यान दिली आहेत.