“आता निवडणूक आयोग सत्तेप्रमाणे चालतोय!”
◻️ बाळासाहेब थोरातांचा निवडणूक आयोगाच्या 'गोंधळा'वर हल्लाबोल
संगमनेर LIVE | राज्याचे माजी महसूल मंत्री आणि कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर थेट आणि गंभीर हल्ला चढवला आहे.
“आत्तापर्यंतच्या राजकीय जीवनात निवडणूक आयोगाचा इतका गोंधळ मी प्रथम पाहत आहे. पूर्वी आयोग स्वायत्त असायचे, पण आता केंद्र आणि राज्यापासून आयोग सत्तेप्रमाणे चालत असल्याचा” अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
मतदान प्रक्रिया अवघ्या एका दिवसावर आलेली असताना अचानक काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री थोरात यांनी संगमनेरात माध्यमांसमोर ही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
थोरात यांनी स्पष्ट केले की, पूर्वीचे आयोग पूर्णपणे स्वायत्त होते, त्यांना निर्णयाचा अधिकार होता आणि सत्ताधारीदेखील त्यांच्यापुढे दबून असायचे. मात्र, आता आयोगाचा निवडणूक कार्यक्रम अत्यंत चुकीचा असून, तो थेट शंकेला वाव देणारा आहे.
ते म्हणाले, प्रत्येकजण काहीतरी सूचना करेल आणि आयोग त्याप्रमाणे आखणी करत असेल तर, हे अत्यंत चुकीचे आहे. आयोगावर सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयाने चुकीच्या पद्धतीने आरक्षण काढू नका असे स्पष्ट निर्देश दिले असतानाही आयोग कसा वागतो, ही काळजीची बाब असल्याचे सांगताना अचानक निवडणुका रद्द करणे किंवा पुढे ढकलणे, या सगळ्याचा जनतेवर काय परिणाम होतो याचा विचार केला जात नाही. एकंदरीत निवडणुकीचा कार्यक्रम आखताना आयोगाने चुका केल्या आहेत, पण त्याचे प्रायश्चित्त जनतेने का भोगावे? असा आक्षेप नोंदवला आहे.
थोरात यांनी या गोंधळाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. "खरेतर ही निरोगी व्यवस्था असली पाहिजे, परंतु तसे घडत नाही. या सर्व प्रकाराची जबाबदारी कोण घेणार? यास कोणाला तरी जबाबदार धरले पाहिजे आणि त्या जबाबदारालाच शिक्षा झाली पाहिजे," अशी थेट मागणी त्यांनी केली.
नगराध्यक्षांसारख्या महत्त्वाच्या पदांची निवडणूक वीस दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्यामुळे, ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कशी पूर्ण होणार, असा मूलभूत प्रश्नही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी उपस्थित केला.