निवडणुकीच्या धावपळीत वाळू तस्करांचा हैदोस; प्रवरा पात्रात महसूल पथकाचा रात्री छापा
◻️आश्वी येथे विनानंबर टिप्परसह साडेसात लाखांचा ऐवज जप्त!
संगमनेर LIVE | संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या कामात महसूल प्रशासन व्यस्त असतानाच, आश्वी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील प्रवरा नदीपात्रात वाळू तस्करांनी अक्षरशः हैदोस घातल्याचे समोर आले आहे. या तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी महसूल पथकाने शनिवारी रात्री उशिरा अचानक कारवाई करत सुमारे सात लाख छप्पन हजार चारशे रुपयांचा ऐवज जप्त केला असून, तो आश्वी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वीसह पंचक्रोशीतील गावांमध्ये वाळू तस्करांकडून प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे. या गैरप्रकारामुळे सर्वसामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणात लूट सुरू झाल्याने, गौणखनिज वाहतूक आणि उत्खननावर कारवाई करण्यासाठी नेमलेल्या पथकाने याची गंभीर दखल घेतली.
तहसीलदार, संगमनेर यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी धोंडीबा भालचीम हे गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील अवैध वाळू उत्खननावर लक्ष ठेवून होते. त्यानुसार, शनिवारी (दि. २९) रात्री ११.२० वाजता मंडळ अधिकारी भालचीम, ग्राममहसूल अधिकारी राजेंद्र धोंडीराम पवार (सुकेवाडी) आणि अरबाज इनामदार (राजापूर) यांच्या पथकाने आश्वी बुद्रुक गावठाणाच्या उत्तर बाजूस, मांची रोड परिसरात गस्त सुरू केली.
गस्तीदरम्यान, पिवळ्या रंगाचा हुड असलेला एक विनानंबरचा संशयित टिप्पर पथकाला दिसला. पथकाने त्यास थांबवून तपासणी केली असता, टिप्परच्या हौदात सुमारे दोन ब्रास वाळू आढळून आली. वाळू वाहतुकीचा परवाना मागितल्यावर टिप्परमधील दोघा इसमांनी परवाना नसल्याचे कबूल केले. मात्र, पथक अधिक चौकशी करत असतानाच या दोघांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून धूम ठोकली आणि ते पसार झाले.
पाठलाग करूनही तस्कर हाती न लागल्याने, पथकाने सदर टिप्पर आणि त्यातील २ ब्रास शासकीय वाळू जप्त केली. जप्त केलेल्या टिप्परची अंदाजित किंमत सात लाख पन्नास हजार आणि वाळूची किंमत सहा हजार चारशे रुपये अशी एकूण सात लाख छप्पन हजार चारशे रुपये इतकी आहे.
दरम्यान या अज्ञात दोघांनी शासकीय वाळूची विनापरवाना वाहतूक करत पर्यावरणाचा ऱ्हास केल्याचे स्पष्ट झाले आहे. मंडळ अधिकारी भालचीम यांनी याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.