सेवा समितीच्या ‘सेवागर्जना’ रॅलीने संगमनेर दणाणले!
◻️ पाणी पळवण्याचा डाव उधळणार; प्रचाराची सांगता विक्रमी गर्दीत
संगमनेर LIVE | संगमनेर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराच्या सांगता पर्वात ‘सेवा समिती'ने आयोजित केलेल्या प्रचार रॅलीने शहरात ऐतिहासिक उत्साह निर्माण केला. हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संगमनेरमधील मेन रोड, बाजारपेठ आणि बस स्थानकासह संपूर्ण परिसर 'सेवा समिती'च्या कार्यकर्त्यांनी गजबजून गेला होता. प्रचाराची ही अभूतपूर्व सांगता या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरली आहे.
जाणता राजा मैदान येथून या प्रचंड रॅलीची सुरुवात झाली. या वेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, डॉ. मैथिलीताई तांबे आणि मनीष मालपाणी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
रॅलीच्या मार्गावर तरुण आणि महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. सर्वत्र सिंहाचे फोटो आणि चेहऱ्यावर प्रचंड उत्साह असलेले हे चित्र संगमनेरकरांच्या एकात्मतेचे प्रतीक होते. रॅली सुरू होण्यापूर्वी लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजीत तांबे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.
रॅलीदरम्यान बोलताना आमदार सत्यजीत तांबे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “बाहेरील लोकांचा संगमनेरच्या प्रगतीवर डोळा आहे आणि ते येथील काही लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून येथील विकास मोडून पाहत आहेत.” संगमनेरच्या पाण्याचा मुद्दा उपस्थित करत ते म्हणाले की, रेल्वे पळवल्यानंतर आता संगमनेर शहरातील पाणी पळवण्याचा त्यांचा डाव आहे आणि त्यासाठी त्यांना ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) आवश्यक आहे, याचसाठी त्यांना नगरपालिका ताब्यात घ्यायची आहे.
तांबे यांनी स्पष्ट केले की, “विकास करण्याची धमक फक्त लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यामध्ये आहे, तर बाकीचे फक्त शहरातून काहीतरी घेण्यात व्यस्त आहेत. याच भूमिकेमुळे संगमनेर शहर मागील एक वर्षापासून अशांत झाले होते. मात्र, आता संगमनेरकर आपल्या गावासाठी आणि शहरासाठी एकवटले आहेत.” ‘सेवा समिती' पुढील पाच वर्षाचे व्हिजन घेऊन अत्यंत काटेकोरपणे आणि नियोजनबद्ध काम करेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
दरम्यान उत्सवासारख्या अभूतपूर्व आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या या रॅलीने केवळ प्रचाराची सांगता केली नाही, तर आगामी निवडणुकीचा सूरही स्पष्ट केला अशी उपस्थितांमध्ये जोरदार चर्चा रंगली होती.