​संगमनेरमध्ये 'ईव्हीएम'च्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह?

संगमनेर Live
0
​संगमनेरमध्ये 'ईव्हीएम'च्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह?

◻️ ​स्ट्रॉग रूममधील सीसीटीव्ही कॅमेरे तब्बल एक तास बंद; उमेदवारांची धावाधाव

​संगमनेर LIVE | ​राज्यातील महत्त्वाच्या असलेल्या संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर मतमोजणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम (EVM) मशीनच्या सुरक्षेबाबत संगमनेर शहरात मोठा राजकीय संभ्रम निर्माण झाला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्रॉग रूममध्ये ठेवलेले ईव्हीएमवर नियंत्रण ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे रविवारी अचानक एक तासासाठी बंद पडले. ही गंभीर बाब निदर्शनास येताच, सर्व प्रमुख उमेदवारांनी आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त केला.

​नगरपालिका निवडणुकीतील सर्व पंधरा प्रभागांतील मतदानासाठी वापरलेले ईव्हीएम मशीन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्रॉग रूममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. हे मशीन उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि शासकीय प्रतिनिधी यांच्या समक्ष सीलबंद करण्यात आले होते आणि त्यावर चोवीस तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर होती.

​रविवारी मध्यभागी हे सीसीटीव्ही कॅमेरे अचानकपणे एक तास बंद झाल्याचे समजताच शहरात एकच खळबळ उडाली. यामुळे संगमनेर सेवा समितीचे माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांच्यासह किशोर पवार, महेश खटाटे, प्रवीण अभंग, अमित गुंजाळ, सौरभ कासार, सचिन सातपुते, लाला खान पठाण, नूर मोहम्मद शेख, अमजद पठाण, सागर कानकाटे आणि संदीप लोहे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी तातडीने स्ट्रॉग रूमकडे धाव घेतली.

​स्ट्रॉग रूमबाहेर जमा झालेल्या संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सध्या देश आणि राज्यांमध्ये ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण असताना, संगमनेरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संभ्रमाला आणखी दुजोरा मिळाला आहे. ‘एक तास सीसीटीव्ही कॅमेरा का बंद होते?’ याचे समाधानकारक उत्तर प्रशासनाकडून मिळू शकले नाही.

​प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असले तरी, ते उमेदवारांच्या आणि नागरिकांच्या प्रश्नांवर ठाम उत्तर देऊ शकले नाहीत, ज्यामुळे संभ्रम आणखी वाढला. संतप्त नागरिकांनी योग्य स्पष्टीकरण न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

​सत्ताधारी काहीही करू शकतात - विश्वासराव मुर्तडक

​या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांनी गंभीर आरोप केले. “देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी ईव्हीएमच्या जोरावर निवडणूक जिंकत असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच संगमनेरमध्ये एक तास सीसीटीव्ही कॅमेरे बंद होणे हा नेमका कोणता प्रकार आहे, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिलेच पाहिजे. काही वेगळे करण्याचा दबाव प्रशासनावर होता का, अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे,” असे मुर्तडक यांनी स्पष्ट केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !