नाशिक - पुणे रेल्वे मार्ग संगमनेरवरूनचं हवा - खासदार भाऊसाहेब वाकचौरे
◻️ रेल्वे मार्गासाठीच्या जनआंदोलन सहभागी होण्याची घोषणा
संगमनेर LIVE | नाशिक - पुणे रेल्वेमार्गाला संगमनेरमार्गेच मंजुरी मिळावी या मागणीसाठी लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, हा मार्ग संगमनेर शहरातूनच गेला पाहिजे. २०१२मध्ये मंजूर झालेल्या या मार्गासाठी आता 'रेडिओ दुर्बिणी'चे कारण देणे योग्य नाही, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
संगमनेर मार्गाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे अमर कतारी, अशोक सातपुते, मेजर महेंद्र सोनवणे, संदीप सातपुते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार वाकचौरे म्हणाले, “लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आम्ही नाशिक-पुणे रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. २०१२ मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी या मार्गाला मंजुरी दिली होती. त्यावेळी नारायणगाव येथील रेडिओ दुर्बिण केंद्राचे कोणतेही कारण देण्यात आले नव्हते. आता अचानक ते कारण पुढे करणे, हे अनाकलनीय आहे.”
रेल्वेमार्ग संगमनेरमार्गे जाणे का आवश्यक आहे, याचे स्पष्टीकरण देताना खासदार वाकचौरे यांनी विकासाच्या संधींवर प्रकाश टाकताना म्हणाले, संगमनेर शहराचा व्यापार, शिक्षण आणि उद्योजकता या रेल्वेमार्गामुळे मोठ्या प्रमाणात वाढेल. पुणे, नाशिक आणि मुंबई या ‘सुवर्ण त्रिकोणा’ वरील हा रेल्वेमार्ग परिसराच्या विकासाची गती वाढवेल. असे मत व्यक्त करताना नारायणगाव दुर्बिणीच्या लांब क्षेत्रावरून रेल्वे नेता येऊ शकते. यावर योग्य पर्याय उपलब्ध असून, रेडिओ दुर्बिणीचे कारण नामंजूर असल्याचे सांगितले.
मागील काळात संगमनेरमधील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या आणि काही शेतकऱ्यांना पैसेही मिळाले. असे असताना, १९ फेब्रुवारी २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक-पुणे रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याची घोषणा केली, ज्यामुळे संगमनेरसह सर्वत्र असंतोष निर्माण झाला.
खासदार वाकचौरे यांनी या निर्णयावर आक्षेप घेत म्हटले की, “मागील काळात मी लोकसभेत तीन वेळा हा प्रश्न उपस्थित केला आहे आणि यापुढेही सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे.”
आमदार सत्यजीत तांबे यांनी रेल्वे मार्गासाठी उभारलेल्या जनआंदोलनात आपण पूर्णपणे सहभागी असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले. तसेच, विधानपरिषदेचे आमदार सत्यजीत तांबे, संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि अकोलेचे आमदार किरण लहामटे यांनी आगामी राज्य अधिवेशनामध्ये हा मुद्दा ताकदीने मांडण्याची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना भेटून विनंती करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
“नाशिक - पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गे झाली पाहिजे, ही इथल्या जनतेची भावना आहे आणि मी संगमनेर-अकोलेच्या जनतेसोबत आहे,” असे भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठामपणे यावेळी सांगितले.