वीजबिल मुक्तीचा सूर्योदय! संगमनेरमध्ये ३,०३९ सौर कृषीपंप कार्यान्वित
◻️ आमदार अमोल खताळ यांची माहिती
संगमनेर LIVE | शेतकऱ्यांवरील वीज बिलाचा मोठा भार कमी करण्यासाठी आणि दिवसा सिंचनासाठी वीज उपलब्ध करून देण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या सौर कृषीपंप योजनेला संगमनेर तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेतून तालुक्यातील तब्बल ३,०३९ सौर कृषी पंप कार्यान्वित झाले असून, हजारो शेतकरी वीजबिलाच्या कचाट्यातून मुक्त झाले आहेत, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
योजनेचा तपशील आणि यशस्वी अंमलबजावणी
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सौरऊर्जेला प्राधान्य दिले. याच धोरणांतर्गत ही महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित करण्यात आली.
या योजनेत संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला असून आकडेवारीनुसार १२ हजार ६४१ एकूण अर्ज दाखल झाले होते. यामध्ये लाभ घेण्यासाठी पैसे भरलेले शेतकऱ्याची संख्या ५ हजार ९०९ होती. तर, योजनेसाठी पात्र ठरलेले ४ हजार ०६४ शेतकऱ्यांना महायुती सरकारने मान्यता दिलेले आणि कार्यान्वित झालेले सौर कृषी पंपाची संख्या ही ३ हजार ०३९ आहे.
आमदार खताळ यांचा विशेष पाठपुरावा
या योजनेत तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी सहभागी व्हावेत यासाठी आमदार अमोल खताळ यांनी विशेष प्रयत्न केले. अर्ज सादर झाल्यापासून ते पंपांना मान्यता मिळेपर्यंत त्यांनी व्यक्तिगत स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच तालुक्यात ३ हजार ३९ सौर कृषी पंपांना महायुती सरकारने तातडीने मान्यता दिली आणि ते सर्व पंप आता पूर्णपणे कार्यान्वित झाले आहेत.
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
सौर कृषी पंप सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांवर असलेला वीज बिलाचा मोठा आर्थिक भार कमी झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शेतकऱ्याला दिवसा सिंचनासाठी वीज उपलब्ध होत आहे, ज्यामुळे शेतीचे काम करणे अधिक सोयीचे झाले आहे.
आमदार अमोल खताळ यांनी सांगितले की, “महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण योजना यशस्वी झाली आहे. यामुळे संगमनेर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.” असे ते म्हणाले आहेत.