भाजपचा अजेंडा ‘धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी’ - बाळासाहेब थोरात
◻️ लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांना पुढे येण्याचे केले आवाहन
संगमनेर LIVE | माजी महसूल मंत्री आणि कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले असून, सत्तेत राहण्यासाठी भाजप कोणत्याही थराचे राजकारण करत आहे. धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी हा भाजपचा मुख्य अजेंडा बनला आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र हा संतांची थोर परंपरा जपणारा प्रदेश असूनही आज उघडपणे धर्माचे राजकारण केले जात आहे, ही चिंताजनक बाब असून, लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे, असे कळकळीचे आवाहन थोरात यांनी यावेळी केले.
‘लोकशाहीची हत्या व व्होटचोरी' प्रदर्शनाचे उद्घाटन
कॉग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘सेवा, कर्तव्य, त्याग’ सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात ‘लोकशाहीची हत्या व व्होटचोरी' या विषयावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, कार्यक्रमाचे संयोजक आणि प्रदेश कॉग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ईव्हीएमवरील शंका आणि पुणेकरांना आवाहन
बाळासाहेब थोरात यांनी ईव्हीएम (EVM) बाबत निर्माण झालेल्या शंकांवर लक्ष वेधले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात पुणेकरांचे मोठे योगदान आहे. त्याच धर्तीवर, लोकशाहीचा मूलभूत पाया वाचवण्यासाठी पुणेकरांनी पुढे येणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. भाजपवर निशाणा साधताना थोरात म्हणाले की, भाजपने तांत्रिक साधने, अफवा आणि जातीय ध्रुवीकरणाचा वापर करून सत्ता काबीज केली, ज्यामुळे देशाची दिशा भरकटली आहे. सोनम वांगचूक यांना अटक, शेतकरी आंदोलन, ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंचे आंदोलन, सरन्यायाधीशांवर बूट फेकणे अशा गंभीर घटनांनंतरही समाजात असलेली उदासीनता त्यांनी चिंता व्यक्त केली.
इतर नेत्यांकडून 'मतचोरी'वर टीका
शिवराज मोरे यांनी मतचोरीच्या पद्धतीवर सखोल टीका केली. मतदानानंतर निकाल पुढे ढकलणे आणि नंतर ईव्हीएमच्या जोरावर सत्ता मिळवणे ही पद्धत लोकशाहीस घातक आहे. या सरकारला रोखण्यासाठी जन आंदोलन उभारण्याची वेळ आली आहे, असे मत त्यांनी मांडले.
संजय मोरे यांनी आर्थिक भ्रष्टाचारासोबत ‘मतचोरी' ही भाजपची मोठी चाल असल्याचे सांगितले. तर, प्रशांत जगताप यांनी मतचोरीचे वास्तव लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असून मतदार याद्यांमधील घोळ तातडीने दूर करण्याची गरज असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश बागवे यांनी केले, तर प्रथमेश आबनावे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील मलके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
काँग्रेसच्या काळात कल्याणकारी उपक्रम
यावेळी बाळासाहेब थोरात यांनी कॉग्रेस सरकारच्या जनहितकारी कामांची आठवण करून दिली. सन २००४ ते २०१४ या दहा वर्षात काँग्रेस सरकारने अन्नसुरक्षा कायदा, शैक्षणिक योजना, भू-अधिग्रहण कायद्यात सुधारणा तसेच जागतिक स्तरावर गाजलेल्या पोलिओ निर्मूलन मोहिमेसह अनेक लोक कल्याणकारी उपक्रम यशस्वीरित्या राबवले, अशी माहिती त्यांनी दिली.