गायक अजय गोगावले सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवी चरणी नतमस्तक!
संगमनेर LIVE (तुळजापुर) | भारतीय संगीत विश्वातील लोकप्रिय संगीतकार अजय - अतुल या जोडगोळीतील गायक अजय गोगावले यांनी आज सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. अजय गोगावले यांनी परंपरागत रीतीरिवाजांनुसार देवीचे कुलधर्म कुलाचार पार पाडले. त्यांनी श्री तुळजाभवानी देवीची ओटी भरून देवीची आरती करत मनोभावे देवींचे दर्शन घेतले. दर्शनावेळी त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
दर्शनानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा व महावस्त्र भेट देत अजय गोगावले यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन चौधर, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, रामेश्वर वाले, जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, दिनेश निकवाडे, सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, नवनाथ खिंडकर तसेच मंदिर संस्थानचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय संगीतसृष्टीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे संगीतकार म्हणून अजय-अतुल हे नाव आज सर्वपरिचित आहे. ‘विश्वविनायक’ या गीतसंग्रहातून संगीत क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या या जोडीने पार्श्वसंगीत, संगीत संयोजन, संगीत दिग्दर्शन आणि पार्श्वगायन अशा सर्वच क्षेत्रांत आपली बहुप्रतिभा सिद्ध केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत 'सावरखेड एक गाव', 'अगं बाई अरेच्या!', 'जत्रा', 'जोगवा', 'नटरंग', 'सैराट' आणि 'चंद्रमुखी' अशा सुपरहिट चित्रपटांतील संगीताने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सैराटमधील संगीताने त्यांची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवली आहे.
हिंदी चित्रपटांमध्ये ‘सिंघम', 'अग्निपथ', 'धडक' यांसारख्या चित्रपटांसाठी दिलेल्या दमदार संगीतामुळे त्यांनी बॉलिवूडमध्येही भक्कम स्थान मिळविले आहे. तेलुगू चित्रपटसृष्टीतील शॉक या चित्रपटालाही त्यांनी संगीतबद्ध केले असून दक्षिण भारतीय रसिकांकडूनही त्यांना भरभरून दाद मिळाली आहे.
विशेष म्हणजे, दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या 'जोगवा' या चित्रपटासाठी दिलेल्या अप्रतिम संगीतामुळे अजय-अतुल यांना २००९ सालचा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कारकिर्दीतील हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. तसेच, संगीत दिग्दर्शनासोबतच त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायनही केले आहे. विशेषतः सैराट चित्रपटामधील 'झिंगाट' आणि 'सैराट झालं जी' या गीतांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळाली आहे. त्यांच्या आवाजाची आणि संगीताची सांगड प्रेक्षकांना नेहमीच भावत असते.