राज्यस्तरीय सायकलिंग व ज्युडो स्पर्धेचे विळद घाट येथे उत्साहात उद्घाटन
◻️ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी विखे पाटील फाउंडेशनचा उपक्रम कौतुकास्पद - डॉ. मेधा सोमैया
◻️ राज्यभरातील ११५ दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग; विजेत्यांची नॅशनल स्पर्धेसाठी निवड
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | दिव्यांग विद्यार्थ्याला समाजातील मुख्य घटकांमध्ये आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम सुरू आहे त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांचे ज्ञान विकसित व्हावे यासाठी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जनसेवा फाउंडेशन काम करत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्याला प्रेरणा व ऊर्जा मिळत असते त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून मनाला समाधान मिळते धनश्री विखे पाटील यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन स्पेशल ओलंपिक भारत महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.मेधा सोमैया यांनी केले.
स्पेशल ऑलम्पिक भारत महाराष्ट्र अहिल्यानगर व डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सायकलिंग व ज्युडो स्पर्धेचे उद्घाटन विळदघाट येथे संपन्न झाले. यावेळी स्पेशल ओलंपिक भारत महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.मेधा सोमैया, जिल्हाध्यक्ष धनश्री विखे पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देविदास कोकाटे, भगवान तलवारे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, पी. एम. गायकवाड, क्रीडाशिक्षक संजय धोपावकर, संजय साठे, जितेंद्र ढोले, धनेश स्वामी आदीसह क्रीडा शिक्षक पालक दिव्यांग खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनश्री विखे पाटील म्हणाल्या की, दिव्यांग विद्यार्थ्याला मुख्य प्रवाहामध्ये आणून त्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जनसेवा फाउंडेशन यांच्यावतीने गेल्या तीन वर्षापासून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते यावर्षी सायकलिंग व ज्युडो राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये राज्यभरातील ११५ दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता जगाच्या स्पर्धेमध्ये दिव्यांग विद्यार्थी टिकला पाहिजेत क्रीडा स्पर्धेमध्ये हार जीत पारितोषिक यापेक्षा विद्यार्थ्यांनी सहभाग घेणे महत्त्वाचे आहे, स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी घडला जातो असे त्या म्हणाल्या
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले की दिव्यांग विद्यार्थी जीवन जगत असताना विविध संकटाला सामोरे जात संघर्ष करत वाटचाल करत असतात त्यांची ही ऊर्जा प्रेरणा कोतुकास्पद आहे सामान्य विद्यार्थ्यासारखे क्रीडा स्पर्धेमध्ये खेळाचे प्रदर्शन केले त्यांची ही इच्छाशक्ती पाहून मन भारावून गेले असे ते म्हणाले.
विळद घाट बायपास महामार्गावर राज्यस्तरीय दिव्यांग सायकल स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली दिव्यांग विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी बाळगत ५ किलोमीटर सायकल स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली तसेच डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन विळद घाट येथील जिमखाना येथे ज्युडो स्पर्धा यशस्वीपणे पार पडली या स्पर्धेमध्ये मुंबई, कोल्हापूर, पुणे, नाशिक, अमरावती, रायगड, ठाणे, वाशिम, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर आदीसह विविध जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेतील विजेता खेळाडूंची नॅशनल स्पर्धेसाठी निवड होणार आहे.