राष्ट्रीय एकात्मता शिबिरात सोहम आव्हाडला 'उत्कृष्ट स्वयंसेवक' पुरस्कार!
◻️ राष्ट्रीय एकात्मता शिबिरात प्रवरेच्या विद्यार्थ्याचा दबदबा
◻️ देशभरातील ८० विद्यार्थ्यामध्ये महाराष्ट्रातून केवळ १० जणांची निवड
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयाने पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातील स्वयंसेवक सोहम आव्हाड याने अहमदाबाद (गुजरात) येथे आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबिरात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत “उत्कृष्ट स्वयंसेवक” हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. सोहमच्या या देदीप्यमान यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या अत्यंत प्रतिष्ठित शिबिरासाठी देशभरातील विविध राज्यांतून केवळ ८० विद्यार्थ्याची निवड करण्यात आली होती, ज्यात महाराष्ट्रातून फक्त १० विद्यार्थ्याचा समावेश होता. अशा तीव्र स्पर्धेमध्ये सोहम आव्हाडने आपल्या अष्टपैलू प्रतिभेच्या आणि उत्स्फूर्त सहभागाच्या जोरावर परीक्षकांचे व उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले.
या शिबिरात सांस्कृतिक सादरीकरण, नेतृत्व प्रशिक्षण, सामुदायिक सहभाग, आणि विविध सामाजिक जाणीव उपक्रमांमध्ये सोहमने उल्लेखनीय बहुमुखी कौशल्ये सादर केली. त्याने दाखवलेल्या समर्पण आणि उत्कृष्टतेमुळे त्याला हा महत्त्वाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सोहमच्या या राष्ट्रीय स्तरावरील कामगिरीबद्दल संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास दाभाडे यांनी सोहमचा सत्कार करून त्याचे कौतुक केले. सोहमला मिळालेल्या या यशामागे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. आदिनाथ घोलप, प्रा. डी. व्ही. लोखंडे, आणि प्रा. गणेश खेमनर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
दरम्यान सोहम आव्हाडच्या यांच्या अभूतपूर्व कामगिरीमुळे आश्वी महाविद्यालयाचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चमकले असून, त्याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.