मांचीहिल येथील ‘ज्ञानगंगा'ची जिल्हास्तरीय जित कुने डो स्पर्धेत बाजी!
◻️ कोपरगाव येथे झालेल्या स्पर्धेत १२ विद्यार्थ्याची नेत्रदीपक कामगिरी
संगमनेर LIVE (आश्वी) | क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर आणि जिल्हा क्रीडा परिषद, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच जिल्हास्तरीय शालेय जित कुने डो स्पर्धा कोपरगाव येथील क्रीडा संकुल येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धाचे आयोजन जित कुने डो असोसिएशन अहिल्यानगरच्या सहकार्याने करण्यात आले होते.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये संगमनेर तालुक्यातील मांचीहिल येथील ज्ञानगंगा विद्यानिकेतन या शाळेतील विद्यार्थ्यानी आपल्या खेळाची उत्कृष्ट क्षमता दाखवत चमकदार कामगिरी केली आहे. या शाळेच्या एकूण १२ विद्यार्थ्यानी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
यामध्ये अमृता बनगैया, संस्कृती सदगीर, सृष्टी डोंगरे, प्रतिक्षा शिंदे, गौरी जऱ्हाड, सुप्रिया भुसाळ, पुष्पांजली पवार, नंदीनी थापा, ऋतुजा आंधळे, गौरी नागरे, साई जेजुरकर, श्रेयश मरकड या १२ विद्यार्थ्याचा समावेश आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्याची आता पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे शाळेचे नाव पुन्हा एकदा राज्यपातळीवर झळकणार आहे.विद्यार्थ्याच्या या नेत्रदीपक यशामागे क्रीडा प्रशिक्षक रवींद्र बनगैया यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
दरम्यान या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संस्थापक शाळीग्राम होडगर आणि प्राचार्य विजय पिसे यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे, मार्गदर्शक प्रशिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन केले आहे.