आमदार खताळाच्या पाठपुराव्यानंतर संगमनेरच्या आरोग्य सुविधांना ‘बूस्टर डोस’!
◻️ १०० बेडचे महिला - बाल रुग्णालय, कामगार हॉस्पिटलला आरोग्यमंत्र्यांकडून ‘ग्रीन सिग्नल’
संगमनेर LIVE (नागपूर) | संगमनेर विधानसभा मतदार संघातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मकता दर्शवत तात्काळ अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
नागपूर विधान भवनातील जुने कामकाज समिती कक्षामध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत संगमनेरमधील आरोग्य क्षेत्राशी निगडित अनेक प्रलंबित प्रकल्पांवर सखोल चर्चा झाली.
बैठकीत कॉटेज हॉस्पिटल येथे १०० खाटांचे अत्याधुनिक स्त्री व नवजात बालके रुग्णालय उभारण्याचा प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले. घुलेवाडी येथे सुरू असलेल्या नव्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाची गती समाधानकारक नसल्याची नोंद घेण्यात आली. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाला तात्काळ आदेश देण्यात आले आहेत.
कामगार व निम्न उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी संगमनेरला कामगार रुग्णालय सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया व निधी उपलब्धतेवर पावले उचलण्यात येण्यार आहेत. तसेच ‘बॉम्बे नर्सिंग होम' नियमांमुळे खासगी रुग्णालयांना निर्माण होणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली.
हा प्रश्न नगर विकास खात्याशी संबंधित असल्याने, राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीत खासगी रुग्णालयांना अडचण न येता नागरिकांना सेवा उपलब्ध राहावी यासाठी नियमांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्यांवर चर्चा होणार आहे.
या बैठकीला राज्याचे आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, डॉ. सुनीता गोल्हाईत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांसह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली असून लवकरच यावर ठोस निर्णय घेतले जातील, असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले. त्यांच्या माध्यमातून संगमनेरच्या आरोग्य सेवेचा स्तर अधिक उंचावण्यासाठी हे प्रयत्न अविरत सुरू राहतील, असा विश्वास खताळ यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे तालुक्यातील नागरिकांना अद्ययावत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असे देखील आमदार खताळ म्हणाले आहेत.