आमदार सत्यजीत तांबेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर उपनिबंधक निलंबित

संगमनेर Live
0
आमदार सत्यजीत तांबेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर उपनिबंधक निलंबित

◻️ महसूल मंत्र्यांचे आदेश; ७७२ घरांच्या 'पोकळी हिस्से' नोंदीचा प्रश्न मार्गी

​संगमनेर LIVE (नागपूर) |​ संगमनेरच्या इंदिरा नगरमधील रहिवाशांच्या मालमत्ता नोंदीचा ६० ते ६५ वर्षापासून रेंगाळलेला गंभीर प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत प्रशासनाच्या कामचुकार अधिकाऱ्याला थेट धारेवर धरले. त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संगमनेरचे उपनिबंधक (सब-रजिस्ट्रार) जाधव यांच्यावर तत्काळ बदली आणि निलंबनाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

​या निर्णायक कारवाईमुळे इंदिरा नगरमधील सुमारे ७७२ नागरिकांच्या ‘पोकळी हिस्से' नोंदीचा मार्ग मोकळा झाला आहे. महसूल मंत्र्यांनी दिलेल्या तीन दिवसांच्या अल्टिमेटमनुसार, प्रशासन आता युद्धपातळीवर कामाला लागले आहे.

​नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार सत्यजीत तांबे यांनी सर्व्हे नंबर १०६ मधील मालमत्ता नोंदीचा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून अत्यंत पोटतिडकीने मांडला. उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी जाधव हे सर्वसामान्यांशी अरेरावीने वागत असून, राजकीय हेतूने कायदेशीर नोंदी टाळत असल्याची गंभीर बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. गोरगरीब नागरिकांना हवालदिल करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मुजोर वर्तनावर तांबे यांनी सभागृहात संताप व्यक्त केला.

​महसूल मंत्र्यांकडून 'ऑन द स्पॉट' कारवाई

​आमदार तांबे यांच्या आक्रमक भूमिकेची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी सभागृहातच उपनिबंधक जाधव यांच्या बदलीची घोषणा केली. तसेच, “नोंदणी महानिरीक्षक (IGR) स्वतः तीन दिवसांत संगमनेरला जातील आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करतील. जाधव यांनी दस्त लावण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली असल्यास त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली जाईल,” असे कडक आदेश मंत्र्यांनी दिले आहेत.

​७७२ कुटुंबांसाठी तीन दिवसीय विशेष कॅम्प

​इंदिरा नगरमधील जवळपास ७७२ नागरिकांचे दस्त नोंदणीसाठी प्रलंबित आहेत. हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी महसूल मंत्र्यांनी विशेष कॅम्प लावण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील तीन दिवस अतिरिक्त मनुष्यबळ वापरून, IGR यांच्या थेट देखरेखीखाली हे सर्व दस्त नोंदवले जातील. ५० ते ३०० चौरस फुटांच्या छोट्या घरांत राहणाऱ्या या गोरगरिबांना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी आमदार तांबे यांनी घेतलेली भूमिका अत्यंत निर्णायक ठरली आहे.

​मालदाड रोड परिसराच्या आशा पल्लवित

​इंदिरा नगरचा अत्यंत क्लिष्ट मानला जाणारा प्रश्न सत्यजीत तांबे यांनी सोडवल्यामुळे आता मालदाड रोड परिसरातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला आरक्षणाचा (Reservation) प्रश्नही मार्गी लागेल, अशी नवी चर्चा शहरात सुरू झाली आहे. आजच्या घडामोडींमुळे मालदाड रोडवरील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या असून लवकरच या तिढ्यावरही कायमस्वरूपी तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

​प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश

​संगमनेरमधील शासकीय अधिकारी एका विशिष्ट राजकीय दबावाखाली काम करत होते. मात्र, आमदार सत्यजीत तांबे यांनी आज थेट सभागृहात आवाज उठवून ‘ऑन द स्पॉट' कारवाई करायला लावली. यामुळे कामचुकार आणि मुजोर अधिकाऱ्यांना जबरदस्त चपराक बसली आहे. “जनतेच्या कामात राजकारण कराल, तर गाठ सत्यजीत तांबेंशी आहे,” असा स्पष्ट संदेश या कारवाईतून संगमनेरच्या प्रशासकीय वर्गाला मिळाला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !