रिकव्हरी चोरी विरोधात साखर आयुक्तांकडे तक्रार दाखल करणार - किसान सभा
◻️ एफआरपी कमी करण्यासाठी कारखान्यांकडून शेतकऱ्यांची लूट
संगमनेर LIVE | ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली ऊसाला रास्त पहिली उचल मिळावी यासाठी राज्यभर तीव्र आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनांमुळे अनेक साखर कारखान्यांना नाइलाजाने ५०० ते ६०० रुपयांची वाढ करून उचलीचे करार शेतकरी संघटनांशी करावे लागले आहेत. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या हक्काची 'रिकव्हरी' आणि 'वजन' चोरी करून मोठी लूट केली जात असल्याचे गंभीर आरोप किसान सभेने केला आहे.
त्यामुळे युवा शेतकरीसुद्धा वेगवेगळ्या मंचांच्या माध्यमातून या आंदोलनामध्ये सक्रिय झाले असून, त्यांनी कारखानदारांच्या या लुटीवर आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अनेक कारखान्यांनी आपली रिकव्हरीची आकडेवारी पद्धतशीरपणे कमी-कमी केल्याचे निदर्शनास आले आहे. यामागे कारखानदारांची मोठी चलाखी असून, एफ.आर.पी. नुसार शेतकऱ्यांना कमी पेमेंट द्यावे लागावे, यासाठी ही 'रिकव्हरी चोरी' केली जात आहे.
ज्या कारखान्यांचे इथेनॉल प्रकल्प आहेत, तिथे इथेनॉल निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालामध्ये साखरेचे प्रमाण ठेवले जाते. यामुळे कारखान्याची एकूण साखरेची रिकव्हरी कृत्रिमरीत्या कमी होते आणि परिणामी त्या कारखान्याची एफआरपीची रक्कमही कमी निघते. इथेनॉल आणि इतर उप-पदार्थांपासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये शेतकऱ्याला वाटा देण्यासाठी 'रेव्हेन्यू शेअरिंगचा फॉर्मुला' अस्तित्वात आहे. परंतु, कारखाने चलाखी करून खर्च आणि उत्पन्न समान दाखवून शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे रेव्हेन्यू शेअरिंग देण्याचे टाळत आहेत. ही शेतकऱ्यांची थेट आर्थिक लूट आहे. असे किसान सभेने म्हटले आहे.
रिकव्हरीच्या चोरीसोबतच ऊस वाहतुकीदरम्यान वजनाची सुद्धा अनेक ठिकाणी चोरी केली जाते. कमी वजन दाखवून शेतकऱ्यांना आर्थिक फटका दिला जातो. वजनाच्या अचूकतेमध्ये आणि रिकव्हरीच्या आकडेवारीत कोणतीही पारदर्शकता ठेवली जात नाही.
रिकव्हरी आणि वजनाच्या मापनामध्ये पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र, कारखानदार ही पारदर्शकता टाळत असल्यामुळे शेतकऱ्यांची लूट सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या या लुटीचा पडदा पाडण्यासाठी युवा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने समोर येण्याची गरज आहे, असे आवाहन किसान सभेने केले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची साखर आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी किसान सभा व ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. कारखानदारांनी रिकव्हरी व वजन चोरी थांबवावी, अन्यथा अशा कारखान्यांच्या विरोधात राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, डॉ. अजित नवले, आणि उमेश देशमुख यांनी दिला आहे.