भाजपच्या हुकूमशाही राजकारणाविरुद्ध ‘वज्रमूठ’ गरजेची - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
भाजपच्या हुकूमशाही राजकारणाविरुद्ध ‘वज्रमूठ’ गरजेची - बाळासाहेब थोरात

◻️ स्वबळाची तयारी ठेवा, पण भाजपला रोखण्यासाठी समविचारी पक्षांशी ‘आघाडी’ करा


​संगमनेर LIVE | “निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाने स्वबळावर लढण्याची तयारी ठेवणे महत्त्वाचे असतेच, मात्र सध्या देशात भाजपचे जे लोकशाहीविरोधी राजकारण सुरू आहे, ते जनतेच्या हिताचे नाही. या प्रवृत्तीला पराभूत करण्यासाठी जर मित्रपक्ष एकत्र येत असतील, तर त्यांना नक्कीच सोबत घेतले पाहिजे," असे ठाम मत कॉग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

​नवी दिल्ली येथे पार पडलेल्या कॉग्रेसच्या राष्ट्रीय वर्किग कमिटीच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

​​केंद्र सरकारने 'मनरेगा' योजनेतून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव हटवण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो अत्यंत क्लेशदायक आणि विकृत प्रवृत्तीचे दर्शन घडवणारा आहे. थोरात यांनी या निर्णयावर कडक शब्दांत टीका करताना म्हटले की, मनरेगा ही केवळ एक योजना नसून गोरगरीब जनतेच्या हाताला शाश्वत काम देणारी एक क्रांतीकारी व्यवस्था आहे. महात्मा गांधी हे संपूर्ण जगासाठी मानवतावादाचा संदेश देणारे आदर्श व्यक्तिमत्व आहेत; त्यामुळे अशा थोर नेत्याचे नाव या लोकोपयोगी योजनेतून वगळण्यामागचा उद्देश अनाकलनीय आणि दुर्दैवी आहे.

सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या या योजनेत ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याची मोठी ताकद आहे. अशा परिस्थितीत गांधीजींचे नाव हटवणे हे देशाच्या वैभवाचा अवमान करण्यासारखेच आहे. अशी टिका केली.

​भाजपच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल करताना थोरात म्हणाले की, भाजप सामान्य माणसाचा विचार न करता केवळ ‘पैशाच्या जोरावर सत्ता’ मिळवण्याचे राजकारण करत आहे. “पैशाने कोणालाही विकत घेता येते,” ही भाजपची विचारधारा लोकशाहीसाठी घातक असून, या विरोधात लढण्यासाठी सर्व पुरोगामी शक्तींनी एकत्र येणे आवश्यक आहे.

​नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, “सत्ताधारी भाजपने पैसा आणि सत्तेचा प्रचंड दुरुपयोग केला. असे असतानाही कॉग्रेसने जे यश मिळवले, ते निर्भेळ असून तो लोकशाहीचा विजय आहे. महाराष्ट्र हा कायम पुरोगामी विचारांचा राहिला आहे.”

​महाराष्ट्राच्या बांधणीसाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन करताना थोरात यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा उल्लेख केला. “खासदार शरदचंद्र पवार हे स्वतः पुरोगामी आणि गांधीवादी विचारांचे नेते आहेत. ते राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता योग्य निर्णय घेतील,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !