“ठाकरे बंधूंचे एकत्र येणे जनतेसाठी नव्हे, तर स्वार्थासाठी” - विखे पाटील

संगमनेर Live
0
“ठाकरे बंधूंचे एकत्र येणे जनतेसाठी नव्हे, तर स्वार्थासाठी” - विखे पाटील

◻️“ज्यांनी कॉग्रेस संपवली, तेच आता स्टार प्रचारक!”; बाळासाहेब थोरातावर केली बोचरी टीका


​संगमनेर LIVE | “ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईसह राज्याच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. हे दोन्ही नेते जनतेच्या भल्यासाठी नव्हे, तर केवळ एकमेकांच्या आधारासाठी एकत्र आले आहेत. ज्यांच्या काळात मराठी माणूस उद्ध्वस्त झाला, त्यांना आता जनताच हद्दपार करेल,” अशा शेलक्या शब्दांत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर टीका केली.

​संगमनेर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अमोल खाताळ आणि महायुतीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

​यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत विकासाची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू आहे, त्यामुळे मुंबईची जनता केवळ विकासालाच साथ देईल. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, महायुतीचे जागावाटप आता अंतिम टप्प्यात असून विरोधकांकडे सक्षम उमेदवार नसल्याने आमच्याकडून डावलल्या गेलेल्या लोकांनाच ते संधी देतील, अशी स्थिती आहे.

​तसेच, ज्यांनी स्वतःच्या तालुक्यात कॉग्रेसला संपवले, तेच आज राज्याचे स्टार प्रचारक बनल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त करत, बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता बोचरी टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीसोबत राहणेच सर्वाच्या हिताचे असल्याचे सांगून त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही भर दिला. मतदारांच्या फोटोंसह याद्या समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होणे ही गंभीर बाब असून कार्यकर्त्यानी निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान यावेळी आमदार अमोल खाताळ, श्रमिक उद्योग समूहाचे संचालक अमित नवले, भाजप नेते भीमराज चत्तर, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, सूर्यभान नवले, हरिश्चंद्र चकोर, केशव जाधव, लहानु नवले, उत्तम नवले, परसराम नवले यांसह महायुतीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !