ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांच्या कामावर ‘विखे-खताळां’च्या नावाची पाटी?

संगमनेर Live
0
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांच्या कामावर ‘विखे-खताळां’च्या नावाची पाटी!


◻️ पालकमंत्र्यांची आमदार अमोल खताळ यांच्याकडून दिशाभूल - अजय फटांगरे

◻️ संगमनेरमध्ये ‘श्रेयवादाचा’ हायव्होल्टेज ड्रामा


​संगमनेर LIVE | ​संगमनेर तालुक्यात सध्या विकासकामांच्या उद्घाटनांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असून, कॉग्रेसने आमदार अमोल खताळ आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

​संगमनेर तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय फटांगरे यांनी या उद्घाटन सोहळ्यांचा समाचार घेताना याला ‘राजकीय दिवाळखोरी’ म्हटले आहे. ते म्हणाले की, “पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ ज्या विकासकामांच्या फिती कापण्यात धन्यता मानत आहेत, त्यातील बहुतांश कामे मुळात लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मंजूर झालेली आहेत.”

​मालदाड येथील १७ कोटींच्या रस्त्याच्या उद्घाटनाचा संदर्भ देत फटांगरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या माहितीवरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, “या कामाच्या जाहिरातीत हा रस्ता ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजने’चा असल्याचे मिरवले जात आहे, मात्र प्रत्यक्षात हे काम ‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजने’तून मंजूर झाले आहे. इतकेच नव्हे तर, या कामाची खरी किंमत १७ कोटी नसून १९ कोटी रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे ६ मार्च २०२३ रोजी जेव्हा या कामाला अधिकृत मंजुरी मिळाली, तेव्हा अमोल खताळ हे आमदारही नव्हते. ज्यांना कामाची मूळ योजना आणि अचूक किंमतही माहित नाही, त्यांनी श्रेयासाठी अशी नौटंकी करू नये,” असा टोला फटांगरे यांनी लगावला.

​तालुक्यातील विविध कामांचा पाढा वाचताना फटांगरे यांनी सडक उद्घाटनाच्या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला. पिंपरणे ते कोळवाडे शिरापूर रस्ता हा बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून ८ मार्च २०२३ रोजीच मंजूर झाला होता आणि अमोल खताळ आमदार होण्यापूर्वीच या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले होते. असे असताना आता पुन्हा त्याचे उद्घाटन करून जनतेची दिशाभूल कशासाठी केली जात आहे, असा सवाल त्यांनी केला. तसेच शेंडेवाडी ते हिवरगाव पठार हा रस्ताही २१ जुलै २०२३ रोजी थोरातांच्या मागणीनुसार मंजूर झाला होता. अगदी ग्रामपंचायतींनी स्वतःच्या निधीतून केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रकारही सध्या सुरू असून हा निव्वळ राजकीय स्टंट असल्याचे त्यांनी म्हटले.

​“आमदार महोदयांनी स्वतः नवीन निधी आणावा आणि विकासकामे करावीत, त्याला आमचा विरोध नाही. मात्र, थोरातांच्या कामांवर स्वतःची पाटी लावणे ही जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे.” अशी घणाघात टिका कॉग्रेसचे अजय फटांगरे यांनी केली.

​स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही सर्व 'स्टंटबाजी' केली जात असल्याचा दावा कॉग्रेसने केला आहे. वर्षभर हातात सत्ता असताना कोणतेही ठोस काम करता आले नाही, म्हणून आता जुन्या कामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

​या संपूर्ण प्रकरणावरून फटांगरे यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ज्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत हे सोहळे पार पडले, त्यांचीही आमदार खताळ यांच्याकडून दिशाभूल केली जात आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्यांना प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील तांत्रिक फरकही समजत नाही, ते जनतेचे सक्षम नेतृत्व काय करणार, अशी विचारणाही त्यांनी केली. संगमनेरची जनता सुज्ञ असून सत्य परिस्थिती त्यांना पूर्णपणे ठाऊक आहे, त्यामुळे केवळ आकड्यांची धूळफेक करून जनतेचा विश्वास जिंकता येणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

​संगमनेरच्या सुज्ञ जनतेला सत्य परिस्थिती माहित असून, श्रेयाची भूक असलेल्यांना जनताच धडा शिकवेल, असा विश्वासही अजय फटांगरे यांनी व्यक्त केला आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे तालुक्यात आगामी काळात राजकीय ठिणग्या पडण्याची चिन्हे आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !