तळेगाव पाणी पुरवठा समिती बरखास्त करून नवी समिती गठीत करा!
◻️ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासनाला निर्देश
संगमनेर LIVE | भोजापूर चारीच्या माध्यमातून तळेगाव पाणी पुरवठा योजनेला पाणी देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. मात्र, अनेक वर्षापासून ठाण मांडून बसलेली १७ गाव तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना समिती तातडीने बरखास्त करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. समितीचा कारभार पारदर्शक करण्यासाठी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी आढावा घेऊन नवीन समिती गठीत करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे ४ कोटी ५८ लाख रुपयांच्या आणि तळेगाव येथे १ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
तळेगाव योजनेचा उल्लेख करताना मंत्री विखे पाटील म्हणाले, “वर्षानुवर्षे तीच माणसे समितीत राहिल्याने कामाचा कोणालाही अंदाज येत नाही. त्यामुळे आता समिती बरखास्त करून त्यात सर्व गावांच्या ग्रामसेवकांचा समावेश करावा. दर महिन्याला या कामाचा आढावा घेण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.”
राज्य सरकार महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी कटिबद्ध आहे. भोजापूर चारीच्या कामासाठी ४४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. भविष्यात या पाण्याचा उपयोग तळेगाव पाणी पुरवठा योजनेला कसा होईल, याचा प्रस्ताव तयार करण्यास त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच मालदाड पाणी पुरवठा योजनेलाही तातडीने निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
विरोधकांवर टीका करताना विखे पाटील म्हणाले की, महायुतीच्या योजना बंद पाडण्यासाठी काही मंडळी कोर्टात गेली होती. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. याउलट महायुती सरकारने सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसा वीज देण्याचे काम सुरू केले असून, सोलर स्ट्रीट लाईटसाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी दिला जाईल.
आमदार अमोल खताळ यांनी यावेळी भाषणात सांगितले की, “निधी महायुती सरकारचा असतो, पण श्रेय घ्यायला दुसरेच पुढे येतात. निळवंडे कालव्यावरील रस्ते, लोखंडी पूल, तळेगाव तलाव दुरुस्ती आणि चौकाचे सुशोभीकरण यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विकासाचा हा वेग कायम राहील." अशी ग्वाही दिली.
दरम्यान या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, भाजपचे भीमराज चत्तर, शिवसेनेचे विठ्ठलराव घोरपडे, सरपंच शशिकला पवार, सरपंच उषा दिघे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.