वंचित गावांना ‘बिताका’चे पाणी देणार - जलसंपदा मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
वंचित गावांना ‘बिताका’चे पाणी देणार - जलसंपदा मंत्री विखे पाटील 

◻️ जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा फडकवणार - आमदार अमोल खताळ

◻️वडगाव लांडगा येथे ४ कोटींच्या कामाचा श्रीगणेशा तर, धांदरफळ येथे ४३ शेतकऱ्यांना ट्रकक्टरचे वितरण


संगमनेर LIVE | विधानसभेला जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्याचे काम आम्ही करीत आहोत. वंचित राहीलेल्या राजापूर, जवळे कडलग, वडगाव लांडगा, पिंपळगाव कोंझीरा आणि धांदरफळ या गावांना बिताका धरणाच्या माध्यमातून पाणी देण्यासाठी जलसंपदा विभाग कटीबध्द असून यासाठी सर्व्हेक्षणासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे ४ कोटी रुपयांच्या एस्केपच्या कामाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला. धांदरफळ येथे कृषी योजनेतून ४३ शेतकऱ्यांना ट्रकक्टरचे वितरण करण्यात आले.

चाळीस वर्षात जे घडले नाही ते एका वर्षात होत आहे. महायुती सरकारच्या कामाचे बोर्ड लावून कोणालाही श्रेय घेवू द्या पण जनतेच्या ह्रदयात महायुतीलाच स्थान असल्याचे स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, नगरपालिका निवडणुकीत राज्यातील जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीली.
महायुतीला राज्याच मोठे यश मिळाले. नगरपालिका निवडणुकीत हेच यश कायम राहीले. संगमनेरात पंजा गायब झाला. उध्दव ठाकरे आणि जाणत्या राजांच्या पक्षाचे काय झाले हे सर्वानी पाहिले आहे. बिहार मध्ये काॅग्रेसचे काय झाले जनतेला कळाले आहे. ज्यांनी पंजा गायब केला तेच आता स्टार प्रचारक झाल्याची बोचरी टिका मंत्री विखे पाटील यांनी केली.

चाळीस वर्षे तुम्हाला रेल्वे आणता नाही. रेल्वे आल्याचे फ्लेक्स बोर्ड लावून दोन निवडणुका जिंकल्या असा टोला लगावून मंत्री विखे यांनी सांगितले की, आमच्याकडे रेल्वे विमानतळ सर्व आले. त्यामुळे तुमची रेल्वे पळविण्याचा प्रश्नच येत नाही. रेल्वेचा जुनाच प्रस्ताव कायम ठेवा ही मागणी मुख्यमंत्र्याकडे केली असून रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनाही भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निळवंडे प्रकल्पाचे जाणत्या राजांनी चारवेळा भूमीपूजन केले. विखे पाटील पाणी येवू देत नाहीत म्हणून टिका केली. अनेक वर्ष तालुक्यात फक्त फक्की टाकण्याचा कार्यक्रम झाला. मात्र महायुती सरकारच्या माध्यमातून पाणी देण्याचे पुण्य आपल्याला मिळाले. मी जलनायक नाही पण वंचित गावांना पाणी देण्यासाठी काम करीत आहे. 

पाण्याचा लाभ न मिळालेल्या मिर्झापूर गावाला पाणी कसा देता येईल याचा विचार करीत असून, बिताका प्रकल्पाचे पाणी देण्याकरीता सर्व्हेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. महायुती सरकारने सौर उर्जा प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले असून कर्हे आणि निमोण प्रमाणेच मिर्झापूरचा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल.

महायुती सरकाराने सुरू केलेली एकही योजना बंद नाही. लाडकी बहीण योजना बंद करावी म्हणून महाविकास आघाडीचे नेते कोर्टात गेले. महाविकास आघाडीच्या काळात जे घडू शकले नाही. महायुती सरकार मात्र शेतकरी युवक बारा बलुतेदारांसाठी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात आम्ही आणलेल्या रस्त्याचे श्रेय घेतले जात आहे. केवळ फ्लेक्स बोर्ड लावून निधी येत नसतो. खोटे श्रेय घेण्याची परंपरा आहे. विधानसभेत जनतेने दिलेल्या संधीच सोन आपण करीत आहोत. केवळ व्यक्तिगत बदनामी करण्याचे सुरू आहे. पण तालुक्यातील जनता हे षडयंत्र हाणून पाडेल. नगरपालिका निवडणुकीत विजय कसा मिळाला हे जनतेने पाहीले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !