४० वर्षे गल्लीपासून दिल्लीपर्यत सत्ता असताना ‘निळवंडेचे’ पाणी कुठे मुरले?
◻️ सरपंच उषा दिघे व उपसरपंच मयूर दिघे यांनी विरोधकांवर हल्लाबोल
◻️ पालकमंत्री आणि आमदारांवर टीका करणाऱ्याना गर्भित इशारा
संगमनेर LIVE | “निळवंडे प्रकल्प तळेगाव भागासाठी वरदान ठरू शकला असता, मात्र त्यावर केवळ राजकारण करत ‘तुमच्या साहेबांनी’ (बाळासाहेब थोरात) ४० वर्षे सत्ता उपभोगूनही कालव्यांची कामे पूर्ण केली नाहीत. ही कामे मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांनाच पुढाकार घ्यावा लागला,” असा घणाघाती आरोप तळेगावच्या सरपंच उषा दिघे व उपसरपंच मयूर दिघे यांनी विरोधकांवर केला आहे.
उपसरपंच मयूर दिघे यांनी विरोधकांचा समाचार घेताना म्हटले की, मागील ४० वर्षांत जनतेला फक्त नळाच्या थेंबा-थेंबावर अवलंबून ठेवण्यात आले. मात्र, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी हा दुष्काळी भाग सुजलाम - सुफलाम करण्याचा ध्यास घेतला. भागवतवाडी तळ्यातील पाणी पाईपलाईनद्वारे थेट तळेगावकरांच्या घरापर्यत पोहोचवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आहे.
“गेली ४० वर्षे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना पाणी कुठे मुरले, याचा हिशोब आधी जनतेला द्या,” असे सांगत दिघे यांनी विरोधकांना आव्हान दिले की, “जर तुम्हाला पाणी दिसत नसेल, तर वेळ सांगा, आमच्या वाहनात बसा, आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष पाणी दाखवतो. तर आगामी निवडणुकांत जनतेच्या दरबारात या, जनताच तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल.” असा घणाघात केला.
तळेगाव आणि निमोण परिसराच्या विकासासाठी सध्या युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. इतिहासात पहिल्यांदाच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भोजापूरचे पाणी तिगाव माथ्यापर्यंत पोहोचले असून, या पुरचारीच्या दुरुस्तीसाठी तब्बल ४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच हे काम पूर्ण होऊन हा परिसर सुजलाम सुफलाम होईल.
दुसरीकडे, १७ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा ज्यांनी बट्ट्याबोळ केला, त्यांना चपराक देण्यासाठी जुनी समिती बरखास्त करून प्रशासकीय देखरेखीखाली नवी पारदर्शक समिती गठीत करण्यात आली आहे. निळवंडेच्या पाण्यामुळे आज भागातील पाझर तलाव भरले असून शेती फुलू लागली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
“केवळ साहेबांची मर्जी राखण्यासाठी पालकमंत्री आणि आमदारांवर टीका करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा,” असा इशाराही यावेळी सरपंच उषा दिघे यांनी दिला आहे.